कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार 
मुंबई

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी मुंबई पालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये आता तंत्रज्ञानाची भर पडली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी मुंबई पालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये आता तंत्रज्ञानाची भर पडली आहे. कचरा टाकणाऱ्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. महापालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून माहीम येथील गजानन वाटिका परिसरात एआय कॅमेरा बसवला असून जी उत्तर विभागात आणखी २३ ठिकाणी, तर मुंबईत १२७ ठिकाणी ए आय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याद्वारे कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल टिपून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.

पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई यांच्या पुढाकाराने हा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रयोगाच्या परिणामकारकतेचा आढावा घेऊन महानगरपालिकेच्या वतीने आगामी काळात मुंबईत विविध ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येईल.

तथापि, नागरिकांनी रस्त्यांवर, उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अथवा अन्यत्र कुठेही कचरा टाकू नये. तसेच, मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सवयी बदलणार

या प्रयोगामुळे कचरा टाकणारी व्यक्ती परावृत्त होऊन संबंधित ठिकाणी कचरा टाकणार नाही. एकूणच नागरिकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविणे आणि कचरा असुरक्षित ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये, हा या प्रयोगामागील प्रमुख उद्देश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘एमसीए’ने 'एनसीएलटी'वर पूर्णपणे ताबा मिळवलाय; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

नाशिक : ध्वजारोहणासाठी गोदाकाठ सजला; राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी डीएमएक्स पिक्सेल थ्रीडी मॅपिंगसह आकर्षक रोषणाई

Thane : अखेर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; शिवसेना पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी पद सोडण्याचा निर्णय

'नागपूरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' - चंद्रशेखर बावनकुळे

२०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलावलेच नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस