मुंबई

अखेर 'त्या' दोन्ही अटी रद्द; BMC ने लिपिक पदासाठी काढली नवी जाहिरात, उमेदवारांसाठी मदत सेवा क्रमांकही जाहीर

मुंबई महानगरपालिकेमधील कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेमधील कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या जाहिरातीमध्ये, उमेदवार हा दहावी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा, असे म्हटले आहे. या आधीच्या जाहिरातीत या परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची अट घातली होती. ती आता रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर आधीच्या जाहिरातीमध्ये पदवी परीक्षा ही किमान ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण होण्याची अट होती. आता पदवी परीक्षेबाबतची ही ४५ टक्के गुणांची अट सुद्धा काढून टाकण्यात आली आहे. 

या पदासाठी आता उमेदवारांना ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंकवरून (यूआरएल) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा आहे.

उमेदवारांसाठी मदत सेवा क्रमांक

उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द केली आहे. त्याचप्रमाणे, पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील '४५ टक्के'  ही अट देखील रद्द करण्यात आली आहे.

आता सुधारित अर्हतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन जाहिरातीनुसार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  https:// www.mcgm. gov.in या संकेतस्थळावरील किंवा https://bit.ly/ 3XxQNli या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८१,१०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६ ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.

उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच काटेकोरपणे पालन करुन नमुन्यातील ऑनलाईन अर्ज वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी