मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेने एकूण ११८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यात भाजपने ८९, तर शिंदेंच्या सेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या पाठींब्या शिवाय भाजपला आपला महापौर बसविणे शक्य होणार नाही. ही बाब हेरून शिंदेसेनेने थेट महापौरपदाचीच मागणी केली. आपल्याला सुरुवातीला अडीच वर्षांसाठी महापौरपद मिळाव अशी मागणी शिंदेसेनेची होती. पण ही मागणी पूर्ण होऊ शकणार नाही, याची कल्पना येताच शिंदेंच्या सेनेने एक पाऊल मागे घेत, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्याला किमान एक वर्षासाठी महापौरपद मिळावे, अशी मागणी केल्याचे समजते. तथापि, ही मागणी पूर्ण करुन भाजप एका दगडात दोन पक्षी मारण्याची शक्यता वर्तविली जात आहे..
आपल्या पाठिंब्याशिवाय भाजप सत्तेवर येऊ शकत नाही, हे जाणून आकड्यांचा खेळ लक्षात घेऊन शिंदेसेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. तथापि, शिंदेसेनेला वर्षभरासाठी महापौरपद दिले जाऊ शकते. शिंदेसेनेला महापौरपद सोडून ठाकरे बंधूंना भाजप अप्रत्यक्षपणे दणका देऊ शकतो. शिंदेसेनेला महापौरपद सोडण्याचे दोन फायदे भाजपला होऊ शकतात. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या २३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईत त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिवसेसेचा महापौर असावा, असे भावनिक कार्ड शिंदेसेनेने बाहेर काढले आहे. त्यामुळे अडीच वर्षे नव्हे तर वर्षभरासाठी भाजप शिंदेसेनेला महापौरपद देऊ शकतो. बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन म्हणून त्यांच्या पक्षाला महापौरपद देत आहोत, अशी घोषणा भाजपकडून केली जाऊ शकते. बाळासाहेबांची शिवसेना आमच्या सोबत असल्याचा दावा भाजपकडून वारंवार केला जातो. त्यामुळे शिंदेसेनेला महापौरपद सोडून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पित करत असल्याचा संदेश भाजपकडून दिला जाऊ शकतो.
महापौरपद वर्षभरासाठी शिवसेनेला देऊन भाजपकडून ठाकरे बंधूंचा प्रचार खोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ‘भाजप हा मराठी माणसांच्या विरोधात आहे. भाजप अमराठी समुदायाची बाजू घेणारा पक्ष आहे’, असा प्रचार, प्रसार ठाकरे बंधूंनी निवडणूक काळात केला होता. आता बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आम्ही शिंदेसेनेसाठी म्हणजेच खऱ्या शिवसेनेला महापौरपद सोडत आहोत असा प्रचार करण्याची संधी भाजपकडून साधली जाऊ शकते. याचा फायदा भाजपला दिर्घकाळ होण्याची शक्यता आहे. आम्ही बाळासाहेबांच्या पक्षासाठी महापौरपद सोडले, असे नरेटिव्ह उभे करुन उद्धव व राज ठाकरे बंधूंची आणि शिंदेंचीही कोंडी केली जाऊ शकते.