मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक कार्यालयाचे सह आयुक्त तथा ओएसडी चंद्रशेखर चोरे यांना हटविण्यासाठी पालिका उपायुक्तांनंतर आता सहाय्यक आयुक्तांनी शड्डू ठोकला आहे. नुकतेच २० सहाय्यक आयुक्तांनी स्वाक्षरी केलेले पत्र पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना देऊन विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) चोरे यांना पदमुक्त तथा मुदतवाढ न देण्याची एकमुखी मागणी केली आहे.
महापालिका आयुक्त कार्यालयातून १ जानेवारी २०२५ रोजी चंद्रशेखर चोरे सेवानिवृत्त झाले होते. मात्र त्यांची पुन्हा मुंबई महापालिकेत आयुक्त कार्यालयातच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेतील उपायुक्तांनी नाराजी दर्शविली होती. मात्र तरीसुद्धा आयुक्तांनी त्यांची एका वर्षासाठी नियुक्ती केली होती. आता त्यांचा ३१ डिसेंबर २०२५ मध्ये एक वर्षाचा कालावधी संपणार आहे. यामुळे एक महिन्याआधी उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्याविरोधात उघडपणे बंड सुरू केले आहे.
गेल्या आठवड्यात पालिकेतील १५ उपायुक्तांनी पत्र पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना पाठवले होते. त्यापाठोपाठ पालिकेतील २० सहाय्यक आयुक्तांनीही उपायुक्तांच्या लढ्याला पाठिंबा दिला.
निवृत्त अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम का करायचे?
उपायुक्तांनी आयुक्तांना पत्र पाठवण्याआधी चौरे यांना हटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सर्व अधिकाऱ्यांनी मिळून पालिका आयुक्तांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याला आयुक्तांनी दाद दिली नाही, असे काही उपायुक्तांचे म्हणणे आहे. मग आम्ही निवृत्त अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायचे, असा सवाल उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी उपस्थित केला.
चोरे हे जवळचे
पालिका आयुक्त कार्यालयात निवृत्तीनंतर ओएसडी पदावर कार्यरत चंद्रशेखर चोरे सहाय्यक आयुक्तांच्या एका गटाला जवळचे वाटतात. पालिकेत नव्याने नियुक्त झालेल्या सहाय्यक आयुक्तांना सध्या प्रशासकीय कामकाजांविषयी चोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. काही सहाय्यक आयुक्तांना चोरे यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याची मागणीसुद्धा आहे. या घडामोडींनंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी काय भूमिका घेतात, याकडे प्रशासकीय अधिकारी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.