शेफाली परब-पंडित / मुंबई
वाढती खर्चाची भरपाई करण्यासाठी २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात पाणी दर वाढवण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी पालिकेच्या जल अभियांत्रिकी विभागाच्या प्रस्तावावर कायदेशीर सल्ला मागवला आहे. १२ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या धोरणानुसार, महापालिकेला दरवर्षी पाणी शुल्क आठ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी आहे. यासंदर्भात आयुक्त भूषण गगरानी म्हणाले, "प्रस्ताव कायदेशीर विभागाकडे त्यांच्या मतासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, पाणी शुल्क तातडीने वाढवण्याचा आमचा कोणताही विचार नाही."
२०१२ साली पालिकेच्या स्थायी समितीने वार्षिक पाणी शुल्क वाढ ८% च्या मर्यादेत ठेवण्याचा ठराव मंजूर केला होता. जल विभागाचा खर्च १५% वाढला असला तरी गेल्या दोन वर्षांत पाणी शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांकडे पाणी शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामध्ये विविध खर्च समाविष्ट करण्यात आले आहेत. महापालिकेचा हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी कायदेशीर सल्ल्यानंतर सादर केला जाईल.