संग्रहित छायाचित्र
मुंबई

उद्या रंगणार ‘मुंबई श्री’साठी पीळदार शरीरसौष्ठवाचे युद्ध; 'मिस मुंबई'साठी महिलांचाही उत्तम प्रतिसाद

मुंबईतील तमाम शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा उद्या धमाका होणार आहे. पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार...

Swapnil S

मुंबई : मुंबईतील तमाम शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका शुक्रवार, ७ मार्चला अंधेरी पश्चिम येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे. या पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितले.

शरीरसौष्ठवपटूंचे पहिले प्रेम असलेल्या आणि लखपती करणार्‍या या स्पर्धेच्या दर्जात कधीही घसरण झालेली नाही. कितीही संकटे असो किंवा आर्थिक अडचणींचा डोंगर उभा ठाकला असतानाही बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने या स्पर्धेच्या आयोजनासाठी कधीही समझोता केलेला नाही.यंदाही ते त्याच थाटात आणि दिमाखात आयोजन करणार असल्याची माहिती खानविलकर यांनी दिली.

मुंबई श्री स्पर्धेत मुख्य फेरीतील ८, फिजीक स्पोर्ट्सचे २ आणि महिलांचा एक अशा ११ गटांमधून किमान २५० खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज आहे. संदीप सावळे, गणेश उपाध्याय, भगवान बोराडे, विशाल धावडे, उबेद पटेल, संकेत भरम, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अरुण नेवरेकर, अमति साटम, संजय प्रजापती, अमोल जाधवसारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. त्यामुळे स्पर्धेतील विजेत्याला सवा लाखांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच द्वितीय विजेता आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे ५० आणि २५ हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाईल.

महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस मुंबई या किताबासाठी संघर्ष होणार असून पुन्हा एकदा रेखा शिंदे जेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करील. तिला किमया बेर्डे, ममता येझरकर, राजश्री माहिते, रिद्धी पारकर यांच्याकडून कडवी झुंज मिळेल.

या स्पर्धेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे वजन तपासणी आणि प्राथमिक चाचणी ७ मार्चला स्पर्धेच्या ठिकाणीच सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत केली जाणार आहे. तसेच खेळाडूंची गैरसोय होऊ नये म्हणून ९२२३३४८५६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

खानविलकर यांचे आर्थिक पाठबळ

संघटनेशी संलग्नन खेळाडूंना बलशाली बनवण्याचे ध्येय उराशी बाळगणारे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी सरसावले आहेत. शुक्रवारी ७ मार्चला होणार्‍या मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार कामगिरी करणार्‍या विविध गटातील तीन खेळाडूंना आगामी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी पाठीवर कौतुकाची थापच नव्हे, तर आर्थिक पाठबळ देण्याचे खानविलकर यांनी जाहीर केले आहे. जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रचंड मेहनतीबरोबर विमानप्रवासापासून हॉटेल आणि स्पर्धा फीसारखे अनेक प्रचंड खर्चही उचलावे लागतात. त्यामुळे आगामी आशियाई स्पर्धेसाठी मुंबई श्री स्पर्धेतील तीन खेळाडूंचे आर्थिक ओझे खुद्द अध्यक्ष उचलणार आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत