मुंबई

Mumbai : विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; राज्य सरकारकडून धमकीची गंभीर दखल, विधानभवन परिसराच्या सुरक्षेत वाढ

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानभवनची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याने गुरुवारी विधानभवन परिसरात खळबळ उडाली.

Swapnil S

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानभवनची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याने गुरुवारी विधानभवन परिसरात खळबळ उडाली. या धमकीचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटून याप्रकरणी सरकारने निवेदन देण्याची मागणी करण्यात आली. या धमकीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने विधानभवन परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असून अभ्यागतांच्या प्रवेशावर निर्बंध आणले आहेत.

मुंबईतील विधानभवनसह मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रो रेल्वेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना या माहितीला दुजोरा दिला. गुरुवारी सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी विधानभवनाच्या अधिकृत ई -मेलवर ही धमकी देण्यात आली. अशी धमकी देणाऱ्या ई-मेलचा संबंध खलिस्तान समर्थकांशी असू शकतो. मात्र, यावर तातडीने भाष्य केल्यास ते घाई केल्यासारखे ठरेल. या मेलमध्ये बॉम्ब आणि क्षेपणास्त्राचा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच अधिकची माहिती देणे संयुक्त होईल, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी विधानभवनाला मिळालेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला. धमकीच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचे कामकाज स्थगित करून विधानभवन इमारतीची संपूर्ण तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली. तर या धमकीबाबत राज्य सरकारने सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी केली.

विधानसभेत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनला मिळालेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले, हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणती शक्ती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खलिस्तानी संघटनेचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. जर अशा महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याच्या धमक्या येत असतील तर हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का? असा सवाल त्यांनी केला.

सध्या अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा या धमकीशी सबंध आहे का? आंतरराष्ट्रीय पातळीवर ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. गृह विभागाने या प्रकरणाचा तपास करून या ई-मेलचा उगम शोधून काढावा आणि यावर राज्य सरकारने तातडीने सभागृहात निवेदन करावे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

बॉम्बशोधक पथक दाखल

दरम्यान, विधानभवनला धमकीचा ई -मेल मिळाल्यानंतर विधानभवनात तातडीने बॉम्बशोधक पथक दाखल झाले. या पथकाने विधानभवन परिसराची तपासणी केली. मात्र, तपासणीत काहीही आढळून आले नसल्याची माहिती विधानभवनातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल