मुंबई : वडाळा येथील ‘हिमालयन हाइट्स’ या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थ (२५) या वकील तरुणीची घरात घुसून हत्या करणारा अपार्टमेंटचा सुरक्षारक्षक सज्जाद अहमद मुघल (२२) याला सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब केले.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने पल्लवीचे वडील अतानू पूरकायस्थ आणि राज्य सरकारने जन्मठेपेऐवजी फाशीच्या शिक्षेची मागणी करत उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळून लावले.
सज्जादने ९ ऑगस्ट २०१२ रोजी पल्लवीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिने प्रतिकार केल्यानंतर त्याने तिची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला त्याच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला होता. मात्र नंतर तो मागे घेत विनयभंगाचा आरोप निश्चित करण्यात आला. ११ वर्षांपूर्वी जुलै २०१४ मध्ये सत्र न्यायालयाने सज्जाद अहमद मुघलला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सज्जादचे हे कृत्य ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ या सदरात मोडत नसल्याने सज्जादला फाशी देता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.