मुंबई

Mumbai : "पूल सुरक्षितच आहे!" बोरिवली स्थानकातील पादचारी पुलाची पश्चिम रेल्वेकडून पुन्हा तपासणी; व्हायरल व्हिडिओतील दावे फेटाळले

बोरिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला तडे गेल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने तपासणी केली. तपासणीत पूल सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mayuri Gawade

मुंबई : बोरिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या (FOB) खालच्या भागात तडे गेल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने पुलाची पुन्हा तपासणी केली आहे. तपासणीनंतर हा पूल पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला असून व्हिडिओमध्ये दिसणारा भाग तडा नसून स्लॅबच्या मूळ रचनेचाच भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर खळबळ

अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बोरिवली स्थानकातील पादचारी पुलाच्या खालच्या भागात तडे गेल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

लाखो प्रवासी वापरत असलेल्या या पुलाच्या संरचनेबाबत प्रश्न उपस्थित होताच पश्चिम रेल्वेने तातडीने तपासणी केली.

‘तडे नाहीत, पूल सुरक्षित आहे’

पश्चिम रेल्वेने 'एक्स'वरील अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुलाच्या स्लॅबची सखोल तपासणी करण्यात आली. स्लॅबच्या आतील भागाची विशेष चाचणी घेण्यात आली असून संरचना सुरक्षित, मजबूत आणि टिकाऊ असल्याचे आढळले.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, व्हिडिओमध्ये दिसणारा वाकलेला किंवा खचल्यासारखा भाग प्रत्यक्षात तडा नसून स्लॅब तयार करतानाच असलेला आकार आहे.

कोणतीही संरचनात्मक समस्या नाही

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डेक स्लॅब आणि त्यावरील पृष्ठभागाची बारकाईने तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कुठेही तडे, खचणे किंवा इतर कोणतीही संरचनात्मक समस्या आढळून आलेली नाही.

मुलुंड दुर्घटनेनंतर वाढली चिंता

१४ फेब्रुवारी रोजी मुलुंड येथे मुंबई मेट्रो-४बीच्या बांधकामस्थळी पॅरापेट स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये अशा पायाभूत सुविधांबाबत संवेदनशीलता वाढली आहे. त्यानंतर विविध ठिकाणच्या संरचनांमध्ये तडे गेल्याचे दावे करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर बोरिवली स्थानकातील पुलासंदर्भातील व्हिडिओनेही मोठे लक्ष वेधून घेतले होते.

अफवांवर विश्वास ठेवू नका : रेल्वे

पश्चिम रेल्वेने व्हायरल व्हिडिओतील दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच तपासणी केलेल्या पुलाचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

"बोरिवली स्थानकातील पादचारी पुलाच्या स्लॅबमध्ये कोणतेही तडे आढळलेले नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून पूल पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी अप्रमाणित माहिती शेअर करणे टाळावे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे," असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली