नवी मुंबईतील सुजित यादव यांच्या कुटुंबासाठी यंदाची दिवाळी एका हृदयद्रावक घटनेमुळे कायमची काळरात्र ठरली. सुजित यांनी आपल्या दीड वर्षांच्या मुलीला, मानसीला, जी प्राण्यांवर खूप प्रेम करायची, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (बोरिवली पूर्व) फिरायला नेले होते. मानसीला प्राणी खूप आवडायचे, त्यामुळे दिवाळीचा हा दिवस तिच्यासाठी खास ठरेल, असा त्यांचा विश्वास होता. मात्र, बुधवारी दुपारी एका भरधाव मोटरसायकलने मानसीला धडक दिली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित (वय ३०, रा- ऐरोली, नवी मुंबई) एका वाहतूक कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामास आहे. दिवाळीनिमित्त सुट्टी घेऊन सुजित आपली पत्नी, मुलगी मानसी आणि १७ वर्षांच्या आतेभावासह बुधवारी दुपारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास, ते टायगर सफारीच्या तिकीट काउंटरजवळ बसले होते. मानसी तिथेच रस्त्याच्या कडेला खेळत होती. त्याचवेळी टायगर केज रोडवरून येणाऱ्या एका रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकलने तिला जोरदार धडक दिली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. सुजितने तातडीने तिला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेले, पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
अपघातानंतर मदन न करता घटनास्थळावरून पळाला
पोलिसांनी आरोपी मोटरसायकलस्वाराची ओळख विनोद केवळे (वय ३७, रावळपाडा, बोरिवली) अशी केली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बेदरकार आणि निष्काळजी वाहन चालवल्यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. स्थानिकांनी मोटरसायकलचा नंबर नोंदवला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला शोधून काढले. तो घटनास्थळावरून कोणतीही मदत न करता पळून गेला होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेमुळे यादव कुटुंब आणि स्थानिक परिसरात शोककळा पसरली असून, दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडले आहे.