मुंबई : आकाशात ३५ हजार फुटांवर कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात गंभीर जखमी असतानाही अतुलनीय शौर्य दाखवून २७ निष्पाप बालकांसह तब्बल १८० प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचवणारे फ्लाय दुबईचे धाडसी पायलट, मूळ मुंबईकर असणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी रविवारी भेट घेतली.
घाटकोपर (पूर्व) येथील 'धवलगिरी' इमारतीत वास्तव्यास असणारे कॅप्टन स्मित यांचे चुलते किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौरांनी भेट घेतली. विशेष म्हणजे, मच्छार कुटुंबीयांचे हे निवासस्थान ज्या प्रभागात येते, तो प्रभाग क्रमांक १३२ हा स्वतः महापौर रितू तावडे यांचा नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व असलेला प्रभाग आहे.
आपल्याच नगरसेवक प्रभागातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सुपुत्राच्या कुटुंबीयांची भेट घेत महापौरांनी संपूर्ण प्रभाग आणि मुंबईकरांच्यावतीने मच्छार कुटुंबीयांना पाठबळ दिले. यावेळी आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.