मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डाऊन मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. या मार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यामुळे रात्री उशिरापर्यंत लोकल विलंबाने धावत होत्या.
ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटून स्पार्क झाल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी लोकलचा वेग कमी होताच ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. या घटनेनंतर प्रशासनाने ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम हाती घेतले. या कालावधीत लोकल सेवा ठप्प झाल्याने डाऊन दिशेला येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जलद मार्गावरील लोकल बंद असल्याने धीम्या मार्गावर ताण आला. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर सीएसएमटीपासून मुलुंडपर्यंत धावणाऱ्या लोकल गर्दीने भरल्या होत्या. गाडीत प्रवेश करण्यास जागा नसल्याने प्रवाशांचे हाल झाले.
या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीहून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांना लोकल खोळंब्यामुळे एक तास अधिक वेळ लागला. बदलापूरहून घाटकोपर येथे लोकल पोहचण्यास दोन तासांपेक्षा अधिक कालावधी लागत होता, तर सीएसएमटीकडे जाण्यासही वेळ लागत होता.
ऐन गर्दीच्या वेळेस लोकल खोळंब्याने प्रवाशांचे हाल
ऐन ‘पीक अवर’ला डाऊन दिशेला जाणाऱ्या लोकल गर्दीने खच्चून भरल्या होत्या. विक्रोळीहून सीएसएमटीला जाण्यासाठी अर्धा तास अधिक खर्ची करावा लागत होता, तर संध्याकाळी सीएसएमटीवरून डाऊन दिशेला जाणाऱ्या सर्वच लोकल भरून वाहत होत्या. त्यामुळे भायखळ्यापासून परळ, दादर, सायन, कुर्ला, घाटकोपरपर्यंत सर्वच फलाटांवर गर्दी झाल्याने प्रवाशांना फलाटावर दाखल झालेल्या लोकल गर्दीमुळे सोडाव्या लागत होत्या.