मुंबई : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे.
रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर कुर्ला-टिळकनगर दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. तर ट्रान्स-हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसेल. ब्लॉक कालावधीत मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असल्याने या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये विविध मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान रात्री १२.३० ते पहाटे ४:३० पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. प्लॅटफॉर्मअभावी या गाड्या राम मंदिर स्थानकात थांबणार नाहीत, तर काही अप आणि डाऊन गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.