मुंबई

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेची विशेष व्यवस्था; १२ अतिरिक्त गाड्यांची घोषणा, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

महापरिनिर्वाण दिनासाठी उपस्थित राहणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत ४ ते ८ डिसेंबरदरम्यान अतिरिक्त रेल्वेसेवेची व्यवस्था केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही चैत्यभूमी, दादर येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. याच अनुषंगाने, मध्य रेल्वेने विशेष उपनगरीय लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

४ ते ८ डिसेंबरदरम्यान अतिरिक्त रेल्वेसेवेची व्यवस्था

महापरिनिर्वाण दिनासाठी उपस्थित राहणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत ४ ते ८ डिसेंबरदरम्यान अतिरिक्त रेल्वेसेवेची व्यवस्था केली आहे. अमरावती, बडनेरा आणि नागपूर मार्गावरून मुंबईकडे धावणाऱ्या एकूण १२ अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि कोणत्याही अनुयायाला प्रवासात अडचण येऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल धीम्या मार्गावर आणि सर्व स्थानकांवर थांबणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी विशेष सेवा प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी परळ–कल्याण या मुख्य मार्गावर ५ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष उपनगरीय सेवा अप व डाऊन दोन्ही मार्गावर चालवण्यात येतील. या सर्व लोकल धीम्या मार्गावर आणि सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. विशेष गाड्यांना दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नंदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे दिले जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

सुरक्षेसाठी पोलिस व रेल्वे कर्मचारी तैनात

या मार्गावर मोठ्या संख्येने अनुयायी प्रवास करतात, याची दखल घेऊन स्टेशन परिसरात सुरक्षाव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मदत केंद्रे व मार्गदर्शन पथके उपलब्ध ठेवण्याची तयारी सुरू आहे. गर्दी हाताळण्यासाठी आरपीएफ, स्थानिक पोलिस व रेल्वे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

रेल्वेचे वेळापत्रक कसे असेल?

  • कुर्ला – परळ :

    कुर्ला स्थानकावरून मध्यरात्री सुटण्याची वेळ : ००:४५, पोहोचण्याची वेळ : ०१:०५

  • कल्याण – परळ :

    कल्याण स्थानकावरून सुटण्याची वेळ : ०१:००, पोहोचण्याची वेळ : ०२:२०

  • ठाणे – परळ :

    ठाणे स्थानकावरून सुटण्याची वेळ : ०२:१०, पोहोचण्याची वेळ : ०२:५५

  • परळ – ठाणे :

    परळ स्थानकावरून मध्यरात्री सुटण्याची वेळ : ०१:१५, पोहोचण्याची वेळ : ०१:५५

  • परळ – कल्याण :

    परळ स्थानकावरून मध्यरात्री सुटण्याची वेळ : ०२:३०, पोहोचण्याची वेळ : ०३:५०

  • परळ – कुर्ला :

    परळ स्थानकावरून सुटण्याची वेळ : ०३:०५, पोहोचण्याची वेळ: ०३:२०

याशिवाय, मध्य रेल्वेसोबतच हार्बर मार्गावरही विशेष लोकल चालवण्यात येणार असून कुर्ला–वाशी–पनवेल या मार्गावर ही सुविधा उपलब्ध असेल.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल