मुंबई

निसर्ग दर्शनासाठी मध्य रेल्वेच्या विस्टाडोम एक्सप्रेस हाऊसफुल्ल!

पावसाळ्यात धबधबे, झरे, हिरवळ असे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी दिवसागणिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक

देवांग भागवत

झुकझुक आगीनगाडी...धुरांच्या रेषा हवेत काढी...हे बडबडगीत असो अथवा ती डोंगर-घाटातून, नदी पुलावरून जाणारी रेल्वे असो. या दोन्हींबद्दलची उत्सुकता अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आजही कायम आहे. अशातच मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर सुरु केलेल्या विस्टाडोम म्हणजेच मोठ्या काचेच्या खिडक्यांसह धावणाऱ्या विशेष डब्यांमुळे हजारो प्रवाशांना बडबडगीतांमधील बोल प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. मध्य रेल्वेवरील विस्टाडोम डब्यांना एप्रिल महिन्यापासून प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पावसाळ्याच्या महिन्यात या गाड्यांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, एप्रिल २०२२ ते जून २०२२ या कालावधीत तब्ब्ल ३० हजार प्रवाशांनी विस्टाडोम डब्यातून प्रवास केला असून याद्वारे जवळपास कोटींचा महसूल मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मुंबई - गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये असोत किंवा मुंबई - पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये असोत. वरून काचेचे छप्पर आणि रुंद खिडक्यांसह हे डबे प्रवाशांना विशेष आनंद देत आहेत. तर पावसाळ्यात धबधबे, झरे, हिरवळ असे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी दिवसागणिक विस्टाडोममधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये २०१८ मध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला होता. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे २६ जून २०२१ पासून मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे मुंबई - पुणे मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला आहे. येत्या २५ जुलैपासून मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्सप्रेसला देखील विस्टाडोम लावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. हा बदल प्रवाशांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या विशेष विस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. यासोबत दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट आणि गॅलरी सुद्धा यात आहे. प्रवास करत असताना निसर्गाचा सुंदर अनुभव आणि त्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी प्रवाशांना विस्टाडोम कोचमुळे मिळाली असून याच वेगळेपणामुळे या सेवेला उदंड प्रतिसाद मागील काही महिन्यांपासून मिळत आहे.

एप्रिल, मे, जून या ३ महिन्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळालेल्या गाड्या आणि प्रवासी संख्या :

डेक्कन एक्सप्रेस (अप-डाऊन) :

महिना प्रवासी संख्या उत्पन्न

एप्रिल २ हजार ४७८ १९ लाख २ हजार ५०३

मे २ हजार ७४७ २२ लाख २ हजार ७९८

जून २ हजार ६३५ २१ लाख ४६ हजार ११४

डेक्कन क्वीन (अप-डाऊन) :

महिना प्रवासी संख्या उत्पन्न

एप्रिल २ हजार २१५ २० लाख ४३ हजार ९२६

मे २ हजार ४६० २४ लाख ९ हजार २६६

जून २ हजार ४६८ २४ लाख २३ हजार ५७१

जनशताब्दी एक्सप्रेस (अप- डाऊन) :

महिना प्रवासी संख्या उत्पन्न

एप्रिल २ हजार ६४२ ५४ लाख ८५ हजार ७९२

मे २ हजार ९२० ५९ लाख ७६ हजार २०४

जून २ हजार ६६६ ५७ लाख १० हजार ११०

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबई फिरायचीये? मग 'या' चर्चना भेट द्यायला विसरू नका

सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा! नॅशनल हेराल्ड केसमध्ये कोर्टाने ED ची तक्रार फेटाळली; "FIR नसेल तर मनी लॉन्ड्रींग...

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक