मुंबई

विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

विनायक मेटे यांचा १४ ऑगस्‍ट रोजी मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेवर अपघाती मृत्‍यू झाला होता.

प्रतिनिधी

शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

विनायक मेटे यांचा १४ ऑगस्‍ट रोजी मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेवर अपघाती मृत्‍यू झाला होता. मेटे यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. हा अपघात नसून घातपात असल्‍याचा आरोप मेटेंच्याच कुटुंबिय तसेच निकटवर्तीयांकडून केला जात आहे. मेटेंच्या आईंनी मेटेंचा मृत्‍यू अपघातात नाही तर घातपातात झाल्‍याचे म्‍हटले आहे. मेटेंच्या पत्नी ज्‍योती मेटे या स्‍वतः डॉक्‍टर आहेत. त्‍यांनी देखील अपघातानंतर लगेचच मेटे यांचे शव पाहिल्‍यानंतर त्‍यांचा मृत्‍यू सांगण्यात येत असलेल्‍या वेळेच्या खूप आधीच झाल्‍याचे मत व्यक्त केले होते. तसेच मेटेंच्या निकटवर्तीयांनी देखील संशय व्यक्‍त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्‍य सरकारने मेटेंचा अपघाती मृत्यू गंभीरतेने घेतला आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर केले होते. आता सीआयडी चौकशी होणार आहे.

चालकाची भूमिका संशयास्पद

पुणे-मुंबई दुतगती महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विनायक मेटे गाडीत दिसत नव्हते. गाडीत पुढे त्यांचा सुरक्षारक्षक दिसत होता. त्यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. त्यामुळे मेटे यांच्या गाडीला अपघात घडला की घडवून आणला, याची चौकशी झाली पाहिजे. विशेष म्हणजे चालक एकनाथ कदम हा वारंवार त्याचा जबाब बदलत असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विनायक मेटे यांचा भाचा बाळासाहेब चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे मेटे यांच्या गाडीच्या अपघाताविषयी दिवसागणिक गूढ वाढत आहे. 

‘‘एकनाथ कदम हा विनायक मेटे यांच्याकडे मागील १२ वर्षांपासून काम करत होता. १४ ऑगस्ट रोजी मेटे यांचे वाहन वेगाने पळवण्यात आले. त्याबाबत हायस्पीडच्या पावत्या झाल्या आहेत. शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी तुषार काकडे यांच्याकडून पहाटे साडेपाच वाजता मला अपघाताची माहिती मिळाली. एकनाथ कदम हा अपघाताच्या दिवशी गाडीवर चालक असल्याचे समजले. मी एकनाथला फोन करुन विचारणा केली. त्याने मला मोबाईलवर बोलताना सुरुवातीला ओळखले नाही. तसेच अपघातग्रस्त जागेचे लोकेशन पाठव, असे सांगितले असता, तेही पाठवले नाही. तो सातत्याने रडत होता; परंतु लोकेशन देत नव्हता,’’ अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.  चालक एकनाथ कदम हा पोलिसांना जबाब देतानाही सातत्याने त्याचे जबाब बदलत होता. त्यामुळे हा अपघात की घातपात, अशी शंका निर्माण झाली असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी  मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी–राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर

Thane : ...तर आम्ही १३१ जागा स्वबळावर लढवण्यास पूर्णपणे तयार; NCP अजित पवार गटाचा इशारा

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात; नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब; अटकेची टांगती तलवार