मुंबई : ऑपरेशन सिंदूरने किनारपट्टीवरील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची असुरक्षितता दाखवून दिली आणि कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ योग्य अशा अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सक्रियपणे काम करत आहे, असे या दलाचे उपमहानिरीक्षक हिमांशू पांडे यांनी सोमवारी सांगितले.
सीआयएसएफच्या 'वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन २०२६' संबंधित पत्रकार परिषदेत पांडे म्हणाले की, कर्मचाऱ्यांना ड्रोन चालवण्याचे आणि अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाच्या तैनातीचे प्रशिक्षण दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूरने विशेषतः किनारी भागातील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची असुरक्षितता दाखवून दिली. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी आम्ही योग्य अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सक्रियपणे काम करत आहोत, असे ते म्हणाले. आम्ही भारत सरकारसाठी अँटी-ड्रोन तंत्रज्ञान धोरणाच्या विकासाचा एक अविभाज्य भाग होतो आणि गृह मंत्रालयाने आम्हाला योग्य तंत्रज्ञान ओळखण्यास आणि गृह मंत्रालयाची संमती घेऊन आमच्या महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर त्याचा वापर करण्यास सांगितले आहे. ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कोणतेही दल या नवीन धोक्यापासून अलिप्त राहू शकत नाही, असे डीआयजींनी माहिती दिली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सुरुवातीपासूनच ड्रोन आणि अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी काम सुरू केले आहे आणि विविध दलांना प्रशिक्षण देण्यासाठी एका प्रशिक्षण संस्थेची केंद्र म्हणून निवड केली आहे, असे ते म्हणाले. काही कालावधीनंतर हे दल यासाठी एक स्वतंत्र विभाग विकसित करेल, असे पांडे यांनी सांगितले.
पांडे म्हणाले, सायक्लोथॉन उपक्रम आयोजित करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे व्यापक सुरक्षा परिस्थितीत धोक्यांबद्दल किनारी समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणे होय.
२८ जानेवारीपासून सायक्लोथॉन
'सीआयएसएफ वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन २०२६' वंदे मातरमच्या १५० व्या वर्षाच्या स्मरणोत्सवाचा एक भाग म्हणून २८ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली जाईल. या कार्यक्रमाची संकल्पना 'सुरक्षित किनारा, समृद्ध भारत' अशी आहे. सीआयएसएफचे जवान भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील अकरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या सायकलींवर ६,५०० किलोमीटर अंतर कापतील.