मुंबई : दादरमधील बहुचर्चित सीकेपी सभा वास्तूचा लिलाव अखेर टळला आहे. बोली लावण्यासाठी ३८ बोलीधारक उत्सुक होते. मात्र, या बोलीधारकांपैकी एकाही इच्छुक बोलीधारकाने लिलावाची बोली लावण्यासाठी स्वारस्यपत्र दाखल केले नसल्यामुळे हा लिलाव अखेर टळला आहे.
ठाणे भारत सहकारी बँकेने कोट्यवधीच्या थकबाकीसाठी सीकेपी सभेच्या दादर येथील वास्तूला बुधवार, १४ ऑक्टोबरला ११.३० वाजता लिलावाची जाहीर नोटीस दिली होती. त्या पार्श्वभूमीवर, ६ ऑक्टोबरला संस्थेच्या विश्वस्तांची भेट घेतल्यानंतर ठाणे भारत सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी हा लिलाव चार महिन्यांसाठी काही अटींवर पुढे ढकलण्याची तयारी दाखवली होती, असे सीकेपी सभेच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते.
यावर चर्चेसाठी बोलवलेली विशेष सर्वसाधारण सभा वादग्रस्त चर्चेनंतर गोंधळात कोणताही निर्णय न घेता काही अपरिहार्य कारणांमुळे तहकूब करावी लागली. त्यामुळे लिलाव होणार की, टळणार, असा प्रश्न सदस्यांना पडला होता. मात्र, कर्ज वसुली न्यायाधीकरणाकडून (डीआरटी) लिलावावर स्टे मिळवण्याची वेळच आली नाही. कारण लिलावासाठी बोली लावायला एकाही इच्छुकाने स्वारस्यपत्र दाखल केले नव्हते, असे बँकेच्या वकिलांनी 'डीआरटी'ला सांगितले, अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी दिली.