मुंबई

विद्यार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्याकडे महाविद्यालयांची पाठ; पुढील वर्षी प्रवेश प्रक्रियेला बंदी; विद्यापीठाचा इशारा

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील आवश्यक कागदपत्रे ८ दिवसांत विहित शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले होते.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील आवश्यक कागदपत्रे ८ दिवसांत विहित शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले होते. मात्र या आवाहनाकडे महाविद्यालयांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयांना एक महिन्याचा कालावधी दिला असून या मुदतीमध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे न देणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाणार आहेत. तसेच पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास बंदी करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे विहित मुदतीत जमा करण्यासाठी परिपत्रानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते. प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर त्याची नाव नोंदणी व पात्रता बाबतचे दस्तऐवज त्याच वर्षात जमा करणे आवश्यक असतानाही अनेक महाविद्यालयांमार्फत विहित मुदतीत कागदपत्रे सादर केली जात नाहीत. शैक्षणिक वर्ष २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांत विविध अभ्यासक्रमांना प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची पात्रतेसंबंधीत अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास महाविद्यालयांची जबाबदारी

मुदतीमध्ये ज्या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांची यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ अशा चार वर्षांत ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर केली नाहीत अशा महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांना पुन्हा एकदा १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. सदर मुदतीत जी महाविद्यालये प्रवेश प्रक्रिये संदर्भात आवश्यक कागदपत्रे शुल्कासह विद्यापीठाकडे सादर करणार नाहीत अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाणार आहेत. तसेच या महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास परवानगी नाकारण्यात येणार असल्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची असेल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन