मुंबई : मुंबईतील काँग्रेसच्या कट्टर समर्थकांची मते कुठेही जाणार नाहीत. मात्र मनसेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर दलित, उत्तर भारतीय, मुस्लिम मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यू. बी. वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर शनिवारी मालाड येथे पार पडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.
मतचोरी, मतदार यादीत घोळ या मुद्द्यावर मविआसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी झाली. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी यांची भेट घेतली, त्यावेळी मविआसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. तर दुसरीकडे मनसे-शिवसेना युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे सोबत शिवसेनेची युती झाली आणि मनसे मविआत सहभागी झाली तर आगामी निवडणुकीत मतांवर परिणाम होऊ शकतो. उत्तर भारतीय, दलित, मुस्लिम मतदारांच्या नाराजीला समोरे जावे लागेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करत काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. "महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू असताना काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहोत," अशी घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. "काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व २२७ जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे," असे चेन्नीथला म्हणाले.
मारझोड करणाऱ्यांसोबत काँग्रेस जाणार नाही - वर्षा गायकवाड
"महाविकास आघाडीमध्ये आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी असला पाहिजे. संविधानाच्या धाग्यातून असला पाहिजे. परंतु काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही," असे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शिवतीर्थावर मनसे-शिवसेना हालचालींना वेग
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शनिवारी भेट घेतली. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून मनसे-शिवसेना युतीबाबत चर्चा झाल्याचे समजते. महाराष्ट्रापाठोपाठ बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पक्षाचे राजकीय वर्चस्व असलेल्या गडांना सुरुंग लागला. अशातच राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा समावेश करण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. परंतु, मनसेमुळे या निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची चिन्ह असल्याने काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला.
काँग्रेसच्या नेत्यांनी बोध घ्यावा - किशोरी पेडणेकर
“बिहारमधील एकंदरित झालेला ऱ्हास पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. तो ऱ्हास पाहिल्यानंतरही त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर लढवावी. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. त्यांचे वरिष्ठ त्यांना थांबवू शकतील. जे लोक स्वबळावर निवडणूक लढवायचा निर्णय घेत आहेत, त्यांना ते योग्य वाटत असेल. परंतु, पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतेय का? हा मोठा प्रश्न आहे. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य? ते पुढील काही दिवसांत कळेल," असे शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
बंडखोरी काँग्रेसमध्ये होणार नाही - पटोले
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताहेय. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश सोहळे पार पडत आहेत. अशात काँग्रेसमध्ये कुठेही बंडखोरी होणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोलेंनी व्यक्त केला. त्याऐवजी भाजपमध्येच बंडखोरी पाहायला मिळत असल्याचा दावा पटोलेंनी केला.