मुंबई

वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्गाची निर्मिती! ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन; 'या' सुविधा मिळणार

दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसर व १६ मंदिरांची वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसर व १६ मंदिरांची वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले असून तीन टप्प्यात पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचे काम होणार आहे. चार मजली हेल्थ सेंटर, चेजिंग रूम, आपला दवाखाना अशा सुविधा भक्तांसह पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील एक-दीड वर्षांत बाणगंगा तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरणार, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाची कामे सुरू असून लवकरच पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे. तसेच तलावातील दगडी पायऱ्यांची दुरुस्ती व सुधारणा, तलावाच्या सभोवताली असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी ‘मिसिंग लिंक’ विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे, अशा प्रमुख कामांचा समावेश आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (डी. विभाग) शरद उघडे यांनी दिली.

डी. विभागात विविध नागरी सेवा-सुविधा देण्यासोबतच महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपआयुक्त (परिमंडळ-१) डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारसास्थळे जतन करण्याची तसेच त्यांची देखभाल करण्याची कार्यवाही केली जात आहे. ऐतिहासिक वारसा ठिकाणांपैकी एक म्हणजे बाणगंगा तलाव आणि त्यालगतचा परिसर. वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरात हा तलाव आहे.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये बाणगंगा तलाव महाराष्ट्र शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्त्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, राम मंदिर, बजरंग आखाडा, वाळुकेश्वर मंदिर इत्यादी प्रसिद्ध मंदिरे आहेत. पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्याने या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

बाणगंगा तलावाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. अकराव्या शतकाच्या पौराणिक संदर्भांमध्ये या तलावाच्या पाऊलखुणा आढळून येतात. या भागात विविध देवीदेवतांची मंदिरे, रामकुंड आदी धार्मिक स्थळेही आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठपुराव्याने या भागात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी पुरातत्व विभाग आणि गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे. पहिल्या टप्प्यात तलाव प्रवेश पायऱ्यांवरील १३ झोपड्या काढण्यात आल्या आणि त्यातील राहिवाश्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नजीकच्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाला कोणतीही नुकसानभरपाई द्यावी लागली नाही. दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करताना त्यांच्या वास्तविकतेला कोणतीही हानी पोहोचू नये आणि त्यांचे तत्कालीन रूप आहे त्या स्थितीतच दिसावे, या अनुषंगाने त्याकाळी वापरण्यात आलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा समावेश आहे. तलावातील गाळ काढताना तलावाच्या तळाशी तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांची हानी होऊ नये, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली कुशल मनुष्यबळाच्या सहाय्याने गाळ काढला जात आहे, अशी माहिती उघडे यांनी दिली.

१५ नोव्हेंबर २०२२ मध्ये पर्यटनस्थळ घोषित!

बाणगंगा तलावाचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्राचीनकालीन महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी बाणगंगा तलाव (वाळकेश्वर, मलबार हिल) परिसर क्षेत्रास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित केले आहे. बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण सोयी-सुविधा विकास करण्याची टप्प्याटप्प्याने कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

तीन टप्प्यात पुनरुज्जीवन अन् सौंदर्यीकरण!

  • पहिल्या टप्प्यात बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलाव परिसरातील दीपस्तंभांची पुर्नउभारणी, आकर्षक विद्युत रोषणाई, तलावाच्या सभोवती असलेला वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी ‘मिसिंग लिंक’ विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यावरील अतिक्रमण हटविणे.

  • दुसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींचे दर्शनी भाग एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावास लागून असलेल्या इमारतींच्या भिंतींवर भित्तिचित्रे व शिल्पे घडविणे, रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन, तलाव परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करुन योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे आणि बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्यांची सुधारणा

  • तिसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलाव ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बनविणे व सदर जागेत असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून त्याठिकाणी वाराणसीच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, सार्वजनिक जागा निर्माण करणे, डॉ. भगवानलाल इंद्रजीत मार्गाचे रुंदीकरण करणे व रस्ता रेषेत बाधित निवासी-अनिवासी बांधकामांचे पुनर्वसन

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?