मुंबई : क्रेडिटवर घेतलेल्या अकरा लाखांच्या दागिन्यांच्या अपहारप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरू केला आहे. किरण रावल आणि खेमराज रावल ऊर्फ सुरेश जैन अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही गुजरात व विरारचे रहिवाशी असल्याचे पोलिसंनी सांगितले. या दोघांनी सुरेश जैन या व्यापार्याच्या नावाने घेतलेल्या दागिन्यांचा अपहार केल्याचा आरोप आहे. लक्ष्मीकांत विश्वनाथ जाना हे सोने कारागिर असून, त्यांचा भुलेश्वर येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात पंधरा कारागिर कामाला आहेत. त्यांचे शिवम गोल्डचे मालक सुरेश जैन हे परिचित आहेत. त्यांच्याशी त्यांचा नियमित व्यवहार सुरू होता. २७ ऑगस्टला त्यांना किरण जैन नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तो शिवम गोल्डचे मालक सुरेश जैन यांचा भाऊ असल्याचे सांगून त्यांना काही दागिने घेऊन त्यांच्या दुकानात बोलाविले होते. त्यामुळे ते शिवम गोल्ड दुकानात सुमारे अकरा लाखांचे दागिने घेऊन गेले होते. त्यानंतर तो त्यांच्याकडील दागिने घेऊन गेला आणि परत आलाच नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सुरेश जैन यांना फोन केला. सुरेश जैनच्या नावाने या दोघांनी त्यांच्याकडून दागिने घेऊन या दागिन्यांचा अपहार केला होता.