CSMT वर शिवाजी महाराजांचा पुतळा होणारच! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण 
मुंबई

CSMT वर शिवाजी महाराजांचा पुतळा होणारच! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

Swapnil S

नागपूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला होता. मात्र, केंद्राने दिलेले उत्तर हे जुन्या आराखड्यानुसार असून, स्थानकाच्या पुनर्विकासाच्या नव्या आराखड्यात शिवरायांच्या पुतळ्याचा समावेश आहे, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

केंद्राने दिलेल्या नकारात्मक उत्तरामुळे हा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत लावून धरला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी हा पुतळा उभारता येणार नाही, असे लेखी उत्तर संसदेतील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना दिल्याने संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून शासनाला वस्तुस्थितीची विचारणा केली.

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे आपले अभिमानाचे स्थान आहे. याठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी पूर्वीही करण्यात आली होती. त्यावेळी यासंदर्भातील आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अलीकडे लोकसभेत राज्यमंत्र्यांकडून आलेले उत्तर हे जुन्या आराखड्याशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत: स्पष्ट केले आहे.”

“नवीन आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात अत्यंत भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. लोकसभेत आलेले उत्तर हे केवळ जुन्या आराखड्यावर आधारित असल्याने गैरसमज निर्माण झाला आहे,” असे स्पष्टीकरणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’

Mumbai : पहिल्याच पावसात पोलखोल! सखल भागात साचले पाणी; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत; महापौरांच्या देखतच मुकादम पडला उघड्या मॅनहोलमध्ये

Mumbai : दरवाजा बंद करण्यावरून लोकलमध्ये प्रवाशाचा खून; 'नालासोपारा फास्ट'मधील रात्रीची घटना, शोधमोहिमेनंतर आरोपी अटकेत

राजकारणातील 'बदले की आग' विझेल का?

आजचे राशिभविष्य,२५ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत