मुंबई

सीएसएमटी स्थानकाचा लवकरच कायापालट होणार; १० हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या कायापालटात स्थानिक विकासाला महत्त्वाचे स्थान दिले आहे.

प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे मुंबईचे वैभवच. मुंबईतील ऐतिहासिक तसेच सर्वाधिक गर्दीचे आणि यूनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळालेल्या या स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. मुंबईतील सीएसएमटी स्थानकासह नवी दिल्ली आणि अहमदाबाद या तीन महत्त्वाच्या स्थानकांसाठी मंत्रिमंडळाने १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे, अशी घोषणा शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. येत्या अडीच वर्षांत सीएमएमटी स्थानकाचे बदललेले रूपडे सर्वांना पाहायला मिळणार आहे.

बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या कायापालटात स्थानिक विकासाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. अत्याधुनिक सेवांसह प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन वेगाने प्रयत्न करत आहे. सद्य:स्थितीत १९९ स्थानकांचे पुनर्बांधणीचे काम सुरू असून, त्यापैकी ४७ स्थानकांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या पुनर्बांधणीबाबत मास्टर प्लॅनिंग आणि डिझाइनअंतर्गत अभ्यास सुरू असल्याचे कॅबिनेट बैठकीत सांगण्यात आले. तर ३२ स्थानकांचे काम सध्या वेगाने सुरू झाले असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीएसएमटीसारख्या ऐतिहासिक आणि तितक्याच महत्त्वाच्या स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या काही वर्षांत सीएसएमटी स्थानकाचे रूपडे बदलणार असून, अनेक नावीन्यपूर्ण बदल होणार आहेत. यामध्ये सौरऊर्जा, जलसंवर्धन यांसारखे पर्यावरणाला हातभार लावणारे उपक्रमदेखील सहभागी असणार आहेत.

सीएसएमटी हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचे आणि १८ प्लॅटफॉर्म असलेले स्थानक असून, त्यापैकी सात प्लॅटफॉर्म हे लोकल सेवेकरिता तर उर्वरित लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आहेत. दररोज या स्थानकात १०.९७ लाख प्रवासी प्रवास करत असून १५०० पेक्षा जास्त जास्त ट्रेन या ठिकाणाहून सुटतात, अथवा दाखल होतात.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली