मुंबई : दिवाळीच्या मंगलमय पहाटे संगीताचे स्वर, भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी मुंबईकरांना 'सुगी'तर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ या विशेष संगीत कार्यक्रमातून मिळाली. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला १० हजारांहून अधिक रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीताच्या सुरेल मैफलीतून दिवाळीचा आनंद द्विगुणित करतानाच राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी सुगी ग्रुपच्या माध्यमातून एकूण २ कोटी १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
या सुरेल पहाटेच्या कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, लोकप्रिय अभिनेता व सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच अभि मुंडे यांच्या विशेष काव्यसादरीकरणाने कार्यक्रमात वेगळी रंगत आणली. प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी (परिजात फाऊंडेशन) आणि अभिनेते मकरंद अनासपुरे (नाम फाऊंडेशन) यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. दिवाळीच्या पहाटे शिवाजी पार्क परिसरात जमलेल्या हजारो संगीतप्रेमींनी सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. संगीत, संस्कृती आणि एकत्र येण्याचा आनंद यांचा अनुभव देणारी यंदाची ‘दिवाळी पहाट’ अविस्मरणीय ठरली.
दुष्काळग्रस्तांसाठी २ कोटी १५ लाख रुपयांची मदत
मुंबईकरांची दिवाळी सुरेल करतानाच राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. 'सुगी'कडून एकूण २ कोटी १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
या निधीचे वितरण पुढील संस्थांना करण्यात येणार आहे.
परिजात फाऊंडेशन - ५१ लाख रुपये
नाम फाऊंडेशन - ५१ लाख रुपये
ग्राम मंगल - ५१ लाख रुपये
सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट - ५१ लाख रुपये
महाजप फाऊंडेशन - ११ लाख रुपये