मुंबई

गणेशमूर्ती विसर्जनासाठी मंडळांची लूट! खासगी क्रेन चालकांकडून हजारोंची मागणी

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतो. माहिम रेतीबंदर येथे दरवर्षी शेकडो गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. या मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लूट होत असल्याचा प्रकार बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान उघडकीस आला आहे. विसर्जनासाठी उपलब्ध खासगी क्रेनमालक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून १ ते २ हजार रुपयांची मागणी करत लूट करतात. त्यामुळे अशा विसर्जनस्थळी पालिका प्रशासनाने क्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

१९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी लगबग सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे आगमन सोहळे सुरू झाले असून अनेक मंडळातील बाप्पाचे आगमनही झाले आहे. मात्र मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न आजही कायम आहे.

मंगळवार १२ सप्टेंबर रोजी जी उत्तर विभागातील संबंधित अधिकारी व समन्वय समितीचे प्रतिनिधी यांनी दादर, माहीम तसेच धारावी या विभागातील रस्त्यातील खड्डे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या व रस्त्यात येणाऱ्या वायर आदींची पाहणी केली असता, धारावीमध्ये आजही काही ठिकाणी खड्डे आढळून आल्याचे दहिबावकर यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे धारावीत कुठल्याच वरिष्ठ अधिकारी यांनी खड्डे, झाडांची झाटणी, गटारे, मोठ्या गटारावरील झाकणे, रस्त्याच्या मध्ये असलेल्या नेट व केबलच्या वायर तसेच कचऱ्याचे डबे, बेस्टच्या जम्पिंग केबल याकडे काहीही लक्ष दिले नाही. ज्युनिअर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोपही दहिबावकर यांनी केला आहे.

यंदाचा गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबरपर्यंत मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. महापालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक समुद्र यामध्ये गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी त्याचप्रमाणे माहीम रेतीबंदर इ. ठिकाणी सालाबादप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. माहीम रेतीबंदर येथे माहीम, धारावी, सायन, शाहूनगर, बांद्रा येथून अनंत चतुर्थीला ३०० हून अधिक मूर्तीचे विसर्जन होते. या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेची क्रेन उपलब्ध नसल्याने खासगी क्रेन मालकाकडून क्रेनची व्यवस्था केली जाते. खासगी क्रेनधारक प्रत्येक सार्वजनिक मंडळाकडून १ ते २ हजार इतक्या रकमेची मागणी करत असतात, अशी तक्रार विसर्जन करणाऱ्या मंडळांनी या शिष्टमंडळाकडे केली आहे.

मंडळांवर विसर्जनाचा अतिरिक्त भार

गणपती विसर्जनासाठी पैसे आकारले जात असल्यामुळे मंडळांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी मंडपाची अनामत रक्कम आणि अन्य बाबींमध्ये सूट दिली असली तरी विसर्जनस्थळी कोणत्याही श्री गणेशाचे विसर्जनाचे शुल्क आकारले जात नसताना माहीम रेतीबंदर येथे मात्र विसर्जन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न आकारता महापालिकेने स्वत:ची क्रेन उपलब्ध करून द्यावी, असे महापालिकेला दिलेल्या पत्रात दहिबावकर यांनी नमूद केले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त