मुंबई

नोटबंदी : जुन्या नोटा जमा करून घ्या! मुंबई हायकोर्टाचे रिझर्व्ह बँकेला निर्देश

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर तत्काळ प्राप्तिकर विभागाने ज्या लोकांच्या चलनी नोटा जप्त केल्या होत्या, त्या लोकांकडून जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर तत्काळ प्राप्तिकर विभागाने ज्या लोकांच्या चलनी नोटा जप्त केल्या होत्या, त्या लोकांकडून जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार आहे.

चलनातून बाद केलेल्या नोटा जमा करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्राप्तिकर विभागाने आधी जप्त केलेली रक्कम त्यानंतर संबंधित लोकांना परत केली होती. या नोटा जमा केल्या जाव्यात, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने वरील निर्णय दिला.

केंद्रात मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर सरकारने नोंव्हेबर २०१६ मध्ये नोटाबंदीचे धोरण जाहीर केले होते. त्यावेळी नागरिकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ रोजी डेडलाईन दिली होती. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी त्यांच्या संयुक्त खात्यातील रक्कम जमा करण्याचे ठरवले होते. मात्र, त्याआधीच २६ डिसेंबर २०१६ रोजी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आणि या नोटा जप्त केल्या. त्या नोटांचा, त्या रकमेचा तपास पूर्ण झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या सहाय्यक संचालकांनी ती रक्कम स्वतःकडे न ठेवता संबंधित व्यक्तींना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रक्कम परत मिळाल्यानंतर त्यांनी ‘आरबीआय’कडे संपर्क साधला. मात्र, आरबीआयने चलनातून बाद झालेल्या नोटा जमा करण्याची मुदत संपल्याचे सांगून याचिकाकर्त्यांकडील रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.

त्याविरोधात कोल्हापूरच्या काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारण्याचे ‘आरबीआय’ला निर्देश देण्याची विनंती करण्यात आली. ही विनंती मान्य करत खंडपीठाने तसे निर्देश रिझर्व्ह बँकेला दिले.

निर्णयाचा हजारो लोकांना होणार फायदा

विशिष्ट नोटांच्या मूल्याचा लाभ याचिकाकर्त्यांना नाकारण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. अंतिम मुदतीवेळी संबंधित नोटा याचिकाकर्त्यांच्या ताब्यात नव्हत्या, तर प्राप्तिकर विभागाकडे होत्या. त्यामुळेच त्यांना आता २० लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्याची परवानगी देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने आरबीआयला दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी–राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर

Thane : ...तर आम्ही १३१ जागा स्वबळावर लढवण्यास पूर्णपणे तयार; NCP अजित पवार गटाचा इशारा

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात; नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब; अटकेची टांगती तलवार