मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी पाय पसरले आहे. मात्र डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. फॉगिंग मशीनची कमतरता, अपुरे मनुष्यबळ, बांधकामस्थळी साचणारे पाणी आणि विभागस्तरावर राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांवरून स्थायी समितीत जोरदार चर्चा रंगली.
गणेश खणकर यांनी डेंग्यूचे रुग्ण वाढत असतानाही प्रशासनाकडून परिस्थितीची पुरेशी गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला. प्रत्येक विभागाला किती फॉगिंग मशीन देण्यात आल्या आहेत, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अमय घोले यांनी विभागस्तरावर फॉगिंगची कामे प्रत्यक्षात दिसत नसल्याचे सांगत मशीनची संख्या अपुरी असल्याचे नमूद केले. जमीर कुरेशी यांनी प्रत्येक विभागात किमान ३० ते ४० कर्मचारी असणे आवश्यक असताना कर्मचाऱ्यांची संख्या उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. झोपडपट्टी भागांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने वेळीच उपाययोजना न झाल्यास रुग्णालयांवर ताण वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.
डॉ. सईदा खान यांनी फॉगिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रातील डिझेल एका तासात संपत असल्याने केवळ ५० टक्के परिसरातच फवारणी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्य यशवंत किल्लेदार यांनी अनेक विभागांत फॉगिंगच्या गाड्या रस्त्यावर दिसत नसल्याची तक्रार केली.
प्रीती सातम यांनी कागदोपत्री काम नको, प्रत्यक्षात फॉगिंग झाली पाहिजे, अशी मागणी केली. टुलिप मिरांडा यांनी महापालिका मुंबईकरांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप करत, त्यांच्या विभागात एका कुटुंबातील तीन जण मलेरियाने बाधित असल्याचे सांगितले. एच-पूर्व विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीदरम्यान अंजता यादव यांनी डेंग्यूमुळे १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची भावनिक माहिती दिली. तेजिंदर तिवाना यांनी धूर फवारणी पर्यावरणपूरक आहे का, याचा अहवाल सादर करण्याची मागणी करत प्रत्येक विभागातील मशीनची माहिती सभागृहासमोर ठेवण्याचे आवाहन केले.
वाढता प्रादुर्भाव बेफिकिरीचे द्योतक
पावसाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असताना साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाची बेफिकिरीचे द्योतक असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली. अखेर हा विषय पुढील बैठकीत सविस्तर चर्चेसाठी घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.