Dharavi : माहीम रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग; हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प | Video 
मुंबई

Mumbai : माहीम रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग; हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प | Video

मुंबईतील धारावीमधील माहीम रेल्वे स्थानकाजवळ आज (दि. २२) दुपारी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. दुपारी साडेबारा वाजता ग्राउंड प्लस वन संरचनेतील झोपडीत ही आग लागली.

नेहा जाधव - तांबे

मुंबईतील धारावीमधील माहीम रेल्वे स्थानकाजवळ आज (दि. २२) दुपारी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. दुपारी साडेबारा वाजता ग्राउंड प्लस वन संरचनेतील झोपडीत ही आग लागली. काही मिनिटांतच ज्वाळांनी विक्राळ रूप घेतले. आगीदरम्यान परिसरात सलग दोन स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने CST मार्गाकडे जाणारी हार्बर लाईन रेल्वेसेवा तात्काळ थांबवण्यात आली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणावर जवान आणि गाड्या तैनात करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. मुंबई फायर ब्रिगेडने ही लेव्हल-१ आग असल्याची माहिती देत, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे स्पष्ट केले.

रेल्वे सेवा विस्कळीत

आगीमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बिघडली. दुपारी १२.४३ वाजता CST मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या. वडाळा–माहीम–वांद्रे दरम्यानचा रेल्वे प्रवास काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले, “प्रवाशांना किंवा गाड्यांना कोणताही धोका नाही. ट्रेन घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आल्या असून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत वाहतूक कमी प्रमाणातच सुरू राहील.”

प्रवाशांची मोठी गैरसोय

हार्बर लाईन थांबल्याने शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. एम-इंडिकेटरवरील अनेक वापरकर्त्यांनी वडाळा ते वांद्रे तसेच गोरेगाव दिशेच्या गाड्या ठप्प असल्याची माहिती शेअर केली. सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमध्ये गाड्या थांबल्यामुळे प्रवासी रुळांवरून चालत पुढे जाताना दिसले. घटनेविषयी माहिती नसल्याने काही प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले.

परिस्थिती नियंत्रणात

अग्निशमन दलाने आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवले आहे. परिसर पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतर हार्बर लाईन सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. आगीमुळे रेल्वेची मुख्य वाहतूक प्रणाली विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Delhi Car Blast : २०२३ पासून जैशचा भारतात साखळी स्फोट घडवण्याचा कट; मुजम्मिल शकीलची चौकशीत धक्कादायक कबुली

शिवसेना-मनसे आधीच एकत्र! कोणाच्याही परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

उमेदवारांना खुर्च्या न दिल्याने अजित पवार भडकले; पोलिसांनाही सुनावलं, म्हणाले, "सांगितलेलं कळतं नाही...

ट्रम्प फॅसिस्ट आहेत का? पत्रकारांचा थेट सवाल; ममदानींना थांबवत डोनाल्ड ट्रम्पच बोलले, “स्पष्टीकरण...

पालघर : शाळेची बॅग ठरली ढाल! पाचवीतल्या २ मित्रांची बिबट्याशी थरारक झुंज