दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाला पुन्हा नवे वळण लागण्याची शक्यता आहे. दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप करणारी नवीन याचिका दाखल करणारे तिचे वडील सतीश सालियान यांचेच नाव यापूर्वी मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते, असा खुलासा झालाय. तिच्या कथित नैराश्याला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपैकी एक म्हणून आधीच्या पोलिस क्लोजर रिपोर्टमध्ये सतीश सालियान यांचे नाव होते.
'मिड-डे'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, दिशा सालियनच्या ८ जून २०२० रोजीच्या कथित आत्महत्येच्या रात्री ती नैराश्यग्रस्त अवस्थेत असल्यामागील कारणांपैकी एक कारण म्हणून तिच्या वडिलांचे नाव नमूद केले होते. मालवणी पोलिसांनी तपासानंतर दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनुसार, "अपयश आलेले काही प्रोजेक्ट्स, मित्रांसोबतचे गैरसमज यासोबतच तिच्या वडिलांनी ठाणे येथील त्यांच्या मसाला निर्मिती युनिटमधील एका महिला कर्मचाऱ्यासाठी दिशाने कष्टाने कमावलेला पैसा उडवल्याचा आरोप होता".
"व्यवसाय व कौटुंबिक कारणांमुळे ती तणावाखाली होती. ती कॉर्नरस्टोन कंपनीमध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती, आणि तिच्याकडे असलेले दोन प्रकल्प थांबले होते, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. दिशाने वडिलांचे विवाहबाह्य सबंध आणि त्यांनी केलेल्या आर्थिक विश्वासघाताबद्दल काही मित्रांनाही सांगितलं होतं. तिच्या मित्रांनी पोलिस जबाबात तिच्या वडिलांच्या विवाहबाह्यसंबंधांबाबत आणि तिने व्यवसायासाठी दिलेला पैसा दुसऱ्या महिलेवर उडवल्याबाबत सांगितले होते. यामुळे ती अत्यंत दुःखी होती", असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते.
४ फेब्रुवारी २०२१ रोजी क्लोजर रिपोर्ट दाखल
दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य सबंधांबद्दल आणि पैशाच्या विश्वासघाताबद्दल काही मित्रांनाही सांगितलं होतं, यामध्ये रोहन रॉय (दिशाचा आणि रोहनचा साखरपूडा झाला होता, दोघे कोविडनंतर लग्न करणार होते) चाही समावेश होता. २ जून २०२० रोजी, पैशांच्या हस्तांतरणाबद्दल वडिलांना विचारणा केल्यानंतर, ती जनकल्याण नगर, मालाड येथे रोहन रॉयच्या फ्लॅटमध्ये राहायला गेली. ८ ते ९ जून २०२० च्या रात्री, दिशाने मालाडमधील जनकल्याण नगर येथील रीजेंट गॅलेक्सी टॉवरच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारल्याचा आरोप आहे. त्यावेळी फ्लॅटमध्ये रोहन रॉयसह तिचे शालेय आणि महाविद्यालयीन मित्र - इंद्रनील वैद्य, दीप अजमेरा, हिमांशू शिखरे आणि रेशा पडवळ - उपस्थित होते. दिशाने इंद्रनिल आणि दीपसाठी बर्थडे पार्टी ठेवली होती. घटना समजताच तिला तातडीने एव्हरशाईन नर्सिंग होम, नंतर तुंगा हॉस्पिटल आणि शेवटी शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तपासादरम्यान पुरावे गोळा करणे आणि साक्षीदारांचे जबाब घेणे यासारख्या प्रक्रिया केल्यानंतर मालवणी पोलिसांनी दिशाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला आणि ४ फेब्रुवारी २०२१ रोजी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
दिशा सुरुवातीला तिच्या पालकांसोबत दादर नायगावमध्ये राहत होती, परंतु मालाडमध्ये फ्लॅट खरेदी केल्यानंतर, ती दोन्ही ठिकाणी वेळ द्यायची आणि राहायची. लॉकडाऊन होईपर्यंत, ती आणि रोहन नायगावमधील तिच्या वडिलांच्या घरी राहत होते, परंतु जून २०२० मध्ये ते मालाडच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले.
सतीश सालियन यांचे वकील काय म्हणाले?
क्लोजर रिपोर्टमधील खुलाशावर प्रतिक्रिया देताना सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी एक निवेदन दिले. ज्यात त्यांनी म्हटले आहे : "हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनकारक निर्णयानुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १७४ अंतर्गत (अपघाती मृत्यू अहवाल/एडीआर) चौकशीत दाखल करण्यात आलेल्या कोणत्याही क्लोजर रिपोर्टला पुराव्याचे मूल्य नाही आणि ज्या प्रकरणांमध्ये दखलपात्र गुन्हा स्पष्टपणे दिसून येतो, अशा प्रकरणांमध्ये आरोपी अशा अहवालावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे पूर्वीचा क्लोजर रिपोर्ट कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही."
वडिलांनी दाखल केलेल्या नवीन याचिकेत काय?
दिशाची आत्महत्या नसून बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याची नवी याचिका दिशाच्या वडिलांनी केली असून याचिकेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेका दिनो मोरिया, सूरज पांचोली, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ अधिकारी सचिन वाझे अशी अनेक उच्चपदस्थ नावे असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.