मुंबई : दिवसेंदिवस महागाई वाढत असली वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त कपडे, फटाक्यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली आहे. महागाईची झळ बसत असतानाही मित्रपरिवार, कंपनीतील कामगार आदींना मिठाई, काजू कतली भेट देण्यासाठी बाजारात लोकांची झुंबड उडाली आहे. मिठाई, काजू कतली खरेदीसाठी ग्राहकांनी आधीच बुकींग केल्याचे दुकांनदारांनी सांगितले. काजू कतली ९५० ते पंधराशे रुपये किलो, मावा पेढे ५५० ते ६०० रुपये किलो इतका दर मोजावा लागत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत काजू कतली,अंजीर कतली बर्फीनेही भाव खाल्ला आहे.
काही दिवसांवर दिवाळी सण आला असून बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. नातेवाईक, मित्र, कंपन्यांमधील कामगार आदींना मिठाई, काजू कतली भेट देण्यासाठी बाजारात गर्दी झाली आहे. दिवाळी म्हटली की फराळ, मिठाई आणि आप्तेष्टांना गोडधोड भेट देण्यासाठी लगबग सुरू होते. मात्र, यंदाच्या दिवाळीत मिठाईच्या वाढलेल्या दरांनी सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे.
ड्रायफ्रूट मिठाईसुद्धा महागली
मिठाई तयार करण्यासाठी लागणारा खवा, दूध, साखर, तूप आणि सुकामेवा यांच्या किमती वाढल्याचा परिणाम मिठाईच्या दरांवर झाला आहे. विशेषतः काजू, बदाम आणि पिस्त्याच्या दरात वाढ झाल्याने ड्रायफ्रूट मिठाई महागली आहे. वाशी येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात काजूचे दर प्रतिकिलो ९५० ते १,५०० रुपये, बदामाचे प्रतिकिलो दर १,१०० ते १,५०० रुपये, तर हिरव्या पिस्त्याचे दर प्रतिकिलो ३,००० ते ३,२०० रुपये असे आहेत. त्यामुळे मिठाई उत्पादकांनाही उत्पादन खर्चाचा फटका बसत आहे.
सुकामेव्याच्या मिठाईचे दरही चढेच
विशेषतः काजू कतली, अंजीर कतली, खवा पेढे आणि सुकामेव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे दर चांगलेच वाढले आहेत. काजू कतलीचे दर प्रतिकिलो ९५० ते १,५०० रुपयांवर पोहोचले असून, अंजीर कतलीसाठी प्रतिकिलो तब्बल १,८०० ते २,२०० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी सणाचा उत्साह आजही कायम आहे. पुढील एक, दोन दिवसांनंतर तर बोलायला वेळ नसेल इतकी गर्दी होईल, असे गुरुकृपा रिफ्रेशमेंट दुकानाचे कामगार राहुल पाठक यांनी सांगितले.
उत्साह मात्र कायम
तर, दुसरीकडे, ग्राहकांनी मिठाई खरेदीचे प्रमाण कमी केले असले तरी दिवाळीत खरेदीचा उत्साह कायम आहे. तसेच भेटवस्तू म्हणून देण्यात येणाऱ्या मिठाईच्या पेट्याही महागल्याचे पाठक यांनी सांगितले.