मुंबई : दिवाळी सणानिमित्त घरगुती सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी उसळली आहे. दिवाळीचा सण जवळ येताच घराघरांत आकर्षक रोषणाई करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा दिवाळीनिमित्त घर, इमारती, बाल्कनी आणि प्रवेशद्वार सजवण्यासाठी विविध प्रकारच्या विद्युत माळा, एलईडी लाइट्स, चमचमणाऱ्या पट्ट्या आणि आकर्षक तोरणे बाजारात दाखल झाली आहेत. आकर्षक लाइट्स, माळा, तोरण खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केटमधील लोहार चाळीत लोकांची झुंबड उडाली आहे. या विद्युत साहित्याच्या प्रसिद्ध बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
घराला आकर्षक रूप देण्यासाठी ग्राहकांकडून रंग बदलणाऱ्या एलईडी माळा, पडद्यासारखे दिसणारे लाइट्स, फुलांच्या आकारातील विद्युत माळा, रोप लाइट्स आणि सजावटीच्या दिव्यांना पसंती दिली जात आहे. पारंपरिक रोषणाईबरोबरच आधुनिक डिझाइनच्या दिव्यांचे पर्यायही बाजारात उपलब्ध आहेत. घराच्या आकारानुसार आणि बजेटनुसार ग्राहक विविध प्रकारच्या लाइट्सची निवड करत आहेत.
बाजारपेठाही विविध वस्तूंनी सजल्या
दिवाळीचा चैतन्यमय उत्साह मुंबईत ठिकठिकाणी दिसून येतो. विविध रोषणाईने मुंबई झळाळून निघते. तर बाजारपेठाही विविध वस्तूंनी सजल्या आहेत. क्रॉफर्ड मार्केटमधील लोहार चाळीत शोभेचे दिवे, आकर्षक कंदील आणि इतर शोभेच्या वस्तू, वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी लाईट्स, वीजेचे दिवे, तोरणं आदी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
ऑफलाईन खरेदीला पसंती
लोहार चाळीत आकर्षक डिझाईनचे लाईट्स मिळतात हे जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे याठिकाणी येण्याआधी ग्राहक ऑनलाईन सर्च करतात, कुठल्या प्रकारच्या लाईट्स उपलब्ध आहेत. त्याच्या किंमती किती आहेत, याचा अंदाज बांधून त्यानंतर ग्राहक विशेषतः दिवाळीनिमित्त लाईट्स खरेदीसाठी लोहार चाळीत येतात, असे ताज इलेक्ट्रिकलच्या दुकानदाराने सांगितले.
विविध लाइट्स, तोरण, माळांचे दर
विद्युत माळा - २० ते १५० रुपयांपासून पुढे.
फेरी / एलईडी माळा - १०० पासून पुढे.
एलईडी स्ट्रिप लाइट्स - ५० ते २०० रुपयांपासून पुढे.
फॅन्सी फुलांच्या लाइट्स - २०० रुपयांपासून पुढे.
आकर्षक सजावटीचे तोरण - ३०० रुपयांपासून पुढे.
विशेष डिझाइनचे शोभिवंत दिवे - ४०० रुपयांपासून पुढे.