धैर्य गजरा
मुंबई : दिवाळी सणानिमित्त देशाच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असल्यास थोडे थांबा. कारण तुम्हाला त्याच विमान भाड्यात परदेशात जाण्याची संधी चालून आली आहे. एरव्ही मुंबई-दिल्ली विमानभाडे ५ हजार असते ते दिवाळीच्या सुट्टीत एकेरी २६,५६० रुपयांवर, तर मुंबई-कोलकाता एकेरी भाडे २६,२१९ रुपयांवर पोहचले आहे, तर मुंबई-लंडन प्रवास भाडे फक्त २५ हजार, मुंबई-बँकॉक १५,९३९ रुपये आहे.
देशातील विमान नियामक यंत्रणेतील गफलतींचा फायदा घेत देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटांचे दर ४५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.
सरकारच्या नियंत्रणाअभावी विमान कंपन्यांनी प्रमुख शहरांमधील तसेच प्रादेशिक मार्गांवरील तिकिटांचे दर विक्रमी पातळीवर नेले आहेत. परिणामी, देशांतर्गत विमानप्रवास हा लंडन किंवा आशियातील प्रमुख शहरांपर्यंतच्या दीर्घ पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासापेक्षाही महाग ठरत असल्याचे विसंगत चित्र निर्माण झाले आहे.
द फ्री प्रेस जर्नलने दिवाळीच्या आसपासच्या गर्दीच्या प्रवासाच्या तारखांमधील विमानभाड्यांचे विश्लेषण केले. त्यातून नियमित तिकीट दर आणि सणासुदीच्या काळातील दरांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले.
दिल्ली-मुंबई मार्गावर दिवाळीपूर्वी ७ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या दिल्ली-मुंबई एकेरी विमानप्रवासाचे तिकीट २६,५६० रुपयांवर पोहोचले आहे. नियमितपणे सुमारे ५,००० रुपये असलेल्या या तिकिटाच्या दरात ४३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी स्पाइसजेटच्या मुंबई-दिल्ली परतीच्या विमानप्रवासाचे भाडे २८,१३० रुपयांपर्यंत पोहोचले असून, त्यात ४६२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
६ नोव्हेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट सध्या १२,५४५ रुपयांना आहे. हा दर नियमित भाड्यापेक्षा ३१८ टक्क्यांनी अधिक आहे. तर याच कंपनीच्या ८ नोव्हेंबरच्या मुंबई-पाटणा विमानाचे तिकीट २८,२२१ रुपयांवर पोहोचले असून, त्यात ३०३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई-कोल्हापूर दरम्यानच्या स्टार एअरच्या विमानाचे ६ नोव्हेंबरचे तिकीट ९,८२० रुपयांवर पोहोचले आहे. या मार्गावरील नियमित भाडे सुमारे ४,००० रुपये असून, त्यात १४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर २१,००८ रुपयांपर्यंत पोहोचले असून, त्यात ३२० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, एतिहाद एअरवेज किंवा अझरबैजान एअरलाइन्ससारख्या कंपन्यांच्या माध्यमातून भारतातून लंडनला जाण्यासाठी सुमारे २५,५०० रुपयांत तिकीट उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बँकॉक, दुबई, कोलंबो, सिंगापूर आणि फुकेत येथे जाण्यासाठी एकेरी विमानप्रवासाचे भाडे १५,००० ते २२,००० रुपयांच्या दरम्यान आहे.
विमानभाड्यांमधील या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. विमान कंपन्यांकडून कृत्रिमरीत्या भाडेवाढ करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयाने १४ दिवसांत अंतिम नियामक नियमावली जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही मुदत आता संपली असूनही नियमावली लागू झालेली नाही.