मुंबई

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न केवळ कागदावर राहणार नाही, तर येत्या दोन वर्षांत या परिसरात आधुनिक, सुसज्ज घरे उभी राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न केवळ कागदावर राहणार नाही, तर येत्या दोन वर्षांत या परिसरात आधुनिक, सुसज्ज घरे उभी राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

मुंबई महानगर प्रदेशातील माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, गेल्या ४५ वर्षांपासून विदारक परिस्थितीत राहणाऱ्या रमाबाई आंबेडकर व कामराज नगरमधील नागरिकांच्या स्वप्नातील पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. यासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. विकासकांच्या गुंतागुंतीपासून दूर राहून, हे काम थेट शासकीय संस्थांकडून करायचा निर्णय शासनाने घेतला. ‘एसआरए’ आणि ‘एमएमआरडीए’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जात असून पहिल्यांदाच ‘एमएमआरडीए’ व ‘एसआरए’ यांना संयुक्तपणे या प्रकल्पात जोडण्यात आले आहे. राज्य सरकारने दोन वर्षांचे आगाऊ भाडे देऊन येथील नागरिकांना तात्पुरत्या निवासाची सोय करून दिली आहे. आता ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’ यांनी दोन वर्षांतच हे बांधकाम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

माता रमाबाईं आंबेडकरांचे स्मारक उभारणार - एकनाथ शिंदे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासोबतच आता त्यांच्या सहचारिणी माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारकदेखील उभारले जाणार आहे. रमाबाई नगरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेतून हे स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

प्रकल्पामुळे स्वाभिमानाचे नवे पर्व सुरू - अजित पवार

रमाबाईनगर आणि कामराज नगर हा परिसर म्हणजे केवळ झोपडपट्टीचा समूह नाही, तर ही जागा संघर्ष, आत्मसन्मान आणि जिद्दीची साक्षीदार आहे. मुंबईच्या विकासात येथील कामगार, कष्टकरी बंधू-भगिनींच्या श्रमाचा आणि घामाचा मोठा वाटा आहे. हा परिसर महाराष्ट्रातील सामाजिक जागृतीचा, परिवर्तनाचा आणि चळवळींचा एक सशक्त केंद्रबिंदू राहिला आहे. माता रमाबाई आणि के. कामराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात आज या प्रकल्पामुळे स्वाभिमानाचे नवे पर्व सुरू होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुनर्वसन सदनिकांची वैशिष्ट्ये

  • पात्र झोपडीधारकांना एक बेडरूम, हॉल व किचन स्वरूपाची, ३०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेली घरे विनामूल्य देण्यात येतील.

  • पहिल्या टप्प्यात ४,३४५ झोपडीधारकांचे पुनर्वसन प्रस्तावित.

  • झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करून परिशिष्ट–२ प्रसिद्ध केले आहे.

  • पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा अंदाजित खर्च १,२९९ कोटी (जीएसटी वगळून).

  • योजना पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी अपेक्षित.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

महसूल विभागाची मुंबईकरांना दिवाळी भेट! महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नोंदणीसाठीची 'ही' अट रद्द