मुंबई

इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती परवडेना ;भक्तांचा कल पीओपीकडेच

मूर्तीच्या दरात ३५ ते ४० टक्के फरक आढळतो

नवशक्ती Web Desk

मुंबई : राज्यासह देशात गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सणाची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे. गणेशोत्सवासाठी सरकार इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती आणा, असे आवाहन करत आहे. मात्र, या मूर्तींची किंमत भरमसाट असल्याने भक्त पीओपीच्या मूर्तीकडेच वळत असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे इको फ्रेंडली गणपती बनवताना मूर्तिकारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे इको फ्रेंडली मूर्ती बनवणे मूर्तिकारांनी बंद केले. इको फ्रेंडली मूर्ती हाताने बनवावी लागते. त्यामुळे ती महाग असते. ही मूर्ती पर्यावरणपूरक असते. त्यामुळे ती काही मिनिटांत पाण्यात विरघळते.

पीओपीच्या मूर्ती स्वस्त व टिकाऊ असतात. मात्र, त्या पर्यावरणाला घातक असतात. अजय सावंत गेल्या २६ वर्षांपासून गणपतीच्या मूर्ती विकत आहेत. ते बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघटनेशी संबंधित आहेत. ते म्हणाले की, मोठ्या जोशात इको फ्रेंडली बाप्पाच्या मूर्ती खरेदी करायला आलेले ग्राहक त्याची किंमत ऐकून गप्प बसतात. त्यानंतर ते पीओपीच्या मूर्तीकडे वळतात. ८० टक्के मूर्ती या पीओपीच्या असतात. दोन्ही प्रकारच्या मूर्तींच्या दरात ४० टक्के फरक असतो.

मूर्तिकार युसूफ गलवानी म्हणाले की, मी इको फ्रेंडली मूर्ती बनवणे यंदाच्या वर्षापासून बंद केले. मी मातीचे दिवे बनवतो. इको फ्रेंडली मूर्ती कोणीही बनवत नाही. गेल्यावर्षी मला १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. लोकांना स्वस्त व टिकाऊ गणपतीची मूर्ती हवी असते. हे सर्व पीओपीतून मिळू शकते. इको फ्रेंडली गणपती बनवण्यासाठी माती लागते. ती साठवून ठेवताना अडचणी येतात. सरकारने पीओपीच्या मूर्तीला परवानगी दिलेले आहे. त्यामुळे भक्तही तीच खरेदी करणार, असे ते म्हणाले.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्स‌मधून फाइन आर्ट‌्सची पदवी घेतलेले मूर्तिकार संदीप गोंगे ही नुकसान सोसून मूर्ती बनवत आहेत. ग्राहकांची खरेदीची क्षमता कमी झाली आहे. आमच्या जागेचे भाडे वाढले असून कच्चा माल महाग झाला आहे. माझे पॅशन असल्याने मी या मूर्ती बनवत आहे व भविष्यातही बनवेन. गणेशोत्सवावरील श्रद्धा राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. पण, पर्यावरणाची चिंता केवळ ग्राहकांवर टाकू नये. जेव्हा मूर्तीच्या दरात ३५ ते ४० टक्के फरक आढळतो. तेव्हा ग्राहक स्वस्त मूर्ती घेतो, असे ते म्हणाले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश