मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रडारवर आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद असो वा पत्रकार परिषद संजय राऊत रोजच शिंदेवर सडकून टीका करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची प्रकृती खालावली असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना फोनवर संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
संजय राऊत यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी फोन करुन लवकर बरे व्हा.. असा आपुलकीचा संवाद साधला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जाहीर सभेतून संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली होती. संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पुढील दोन महिने सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळासह त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.