मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. अशातच, प्रचाराचा एक अनोखा आणि लक्षवेधी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने चक्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचे नेल आर्ट केलं आहे. प्रचाराच्या या अनोख्या आयडियाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
व्हिडिओमध्ये एक तरुणी नेल आर्ट करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवताना दिसते. ही तरुणी एका हाताच्या अंगठ्यावरील नखावर एकनाथ शिंदेंचा चेहरा तर दुसऱ्या अंगठ्यावरील नखावर शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणाचे चिन्ह छापून घेते. राजकीय प्रचाराचा हा हटके प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी या कल्पकतेचे कौतुक केले आहे.
राज्यात सध्या जोरदार प्रचार, सभा आणि राजकीय हालचाली सुरू असताना, सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला हा वेगळ्या धाटणीचा राजकीय पाठिंबा विशेष लक्ष वेधून घेत आहे. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर कसा केला जातो, याचे हे उदाहरण मानले जात आहे. दरम्यान, २०२६ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका १५ जानेवारी २०२६ ला होणार असून, फेब्रुवारी २०२२ मध्ये मागील कार्यकाळ संपल्यानंतर दीर्घ कालावधीनंतर या निवडणुका होत असल्याने त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या या नेल आर्ट व्हिडिओमुळे मुंबईतील प्रचाराच्या चर्चेला एक विषय मिळाला आहे.