मुंबई

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती, कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत मुंबईतील ५८ बंद, आजारी गिरण्यांतील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन १४ सप्टेंबरपासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात आले आहे. राज्यातील गिरणी कामगार, वारसांना पात्रता निश्चितीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधादेखील मंडळातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे.

२१ ऑगस्ट रोजी गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भातील बैठकीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देशित केले होते की, राज्याच्या एकंदरीत जडणघडणीत महत्त्वाचा भाग असलेल्या गिरणी कामगार, त्यांच्या वारसांना हक्काचे घर मिळवून देऊन जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाकडे प्राप्त अर्जांची पात्रता लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी. या निर्देशानुसार गिरणी कामगार पात्रता निश्चितीचे विशेष अभियान वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील पहिला मजला, कक्ष क्रमांक २४०, पणन कक्ष येथे आयोजित करण्यात येत आहे.

गिरणी कामगार, वारसांनी म्हाडा मुख्यालयात येऊन प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याव्यतिरिक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक अर्जदारांपर्यंत पोहोचण्याकरिता व गिरणी कामगार, वारसांच्या सोयीकरिता मंडळातर्फे एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली या संगणकीय आज्ञावलीच्या सहाय्याने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रतेकरिता स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. हे ॲप अर्जदार आपल्या भ्रमणध्वनीवर डाउनलोड करू शकतील. या ॲपची माहिती देण्यासाठी सर्व गिरणी कामगार संघटनेच्या प्रतिंनिधींकरिता मंडळातर्फे १३ सप्टेंबर रोजी सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले.

कॉल सेंटरही सुरू

ॲप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मंडळातर्फे कॉल सेंटरदेखील सुरू करण्यात येणार आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना ९७१११९४१९१ या मोबाइल क्रमांकावरही माहिती मिळणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस