कमल मिश्रा/मुंबई
लिंग समानता आणि सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना, पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरातील ट्रॅक्शन डिस्ट्रीब्यशन (TRD) विभागाने महिलांनी नेतृत्व केलेल्या एक खास मेंटेनन्स टीमची स्थापना केली आहे. या उपक्रमाद्वारे हे सिद्ध होत की यश हे स्त्री-पुरुष अशा लिंगभेदाच्या भिंतींना ओलांडून जात असते. महिलांनी पारंपरिकपणे पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करून दाखविली आहे.
“महिलांची विशेष मेंटेनन्स टीम स्थापन करणे हा समाजातील बदलत्या परिप्रेक्ष्यात एक महत्त्वाची टप्पा आहे. एसी ट्रॅक्शन सिस्टमच्या पॉवर सप्लाय इन्स्टॉलेशन्सची देखरेख करण्याचे काम या महिलांना दिले गेले आहे, आणि ट्रेन ऑपरेशन्स सुरळीत आणि विश्वसनीय होण्यासाठी त्या नक्कीच अग्रभागी आहेत. त्यांच्या भूमिकेचा महत्त्वाचा भाग म्हणजे २५kV आणि ११०kV उपकरणांची देखरेख आणि व्यवस्थापन करणे हा आहे. विशेषत: महालक्ष्मी ट्रॅक्शन सबस्टेशन येथे पश्चिम रेल्वे नेटवर्कच्या दैनंदिन कार्यामध्ये ही टीम महत्त्वाची भूमिका बजावते.”
“गेल्या एक महिन्यात, या टीमने उच्च व्होल्टेज इलेक्ट्रिकल उपकरणांचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी व्यापक प्रशिक्षण घेतले आहे. सोमवारपासून, या समर्पित महिलांना स्वयंपूर्णपणे कामावर नियुक्त केले गेले आहे आणि त्या त्यांच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा नियमांचे पालन करत आहेत. या टीमची नियुक्ती त्यांची क्षमता दाखवतेच, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाची दृढदृष्टी आणि समर्पण देखील दाखवते, जी समावेशकता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देते,” असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिलांच्या मेंटेनन्स टीमची स्थापना हे लिंग समानता आणि कार्यस्थळी विविधतेच्या प्रोत्साहनासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांची साक्ष आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने एक आदर्श उदाहरण सेट केले आहे, ज्यामध्ये समावेशकतेमुळे नवकल्पना आणि कार्यक्षमतेला चालना मिळते, असे दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.
या उपक्रमाची यशस्वीता म्हणजे फक्त नवा मार्ग चोखाळणाऱ्या या महिलांचा विजय नाही, तर समाजासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा संधी समान असतात, तेव्हा परिणाम अद्भूत असतात, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. मुंबई उपनगरातील TRD विभागाच्या अथक समर्पण आणि प्रगतिक दृष्टीने एक उज्ज्वल, अधिक समावेशी भविष्यासाठी मार्ग मोकळा केला आहे, असे त्याने सांगितले.