गिरीश चित्रे/मुंबई:
मुंबईत आजही जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली तर २६ जुलै २००५ च्या आठवणीने धडकी भरते. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला तर हजारो जनावरे जीवाला मुकली. त्यामुळे मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली तर विशेष करून कुर्ला, साकीनाका, मिठी नदी परिसरातील लोकांना धडकी भरते.
२६ जुलैच्या आठवणीने आजही मुंबईकरांना भरते धडकी
२६ जुलै २००५ रोजी ढगफुटी झाल्याने मुंबईची तुंबई झाली आणि त्यानंतर पुन्हा असा प्रकार टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘ब्रिमस्टोवॅट प्रकल्प’ हाती घेतला. ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पामुळे किंग्ज सर्कल, हिंदमाता परळ परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आजही मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली जातात, कोट्यवधी रुपये खर्चून पाणी उपसा करणारे उच्च क्षमतेचे ४८१ पंप बसवण्यात आले आहेत. मात्र गुरुवार २५ जुलै रोजी २५० पंप कार्यरत असल्याने भाडेतत्त्वावर पंपाचा खर्च पाण्यात गेला असून १९ वर्षांनंतर २६ जुलैला मुंबईची परिस्थितीची धास्ती भरते.
मायानगरी मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये महापूर आला आणि महापुरात शेकडो जणांना जीव गमवावा लागला. मुंबईकरांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. २६ जुलैला आलेल्या महापुरानंतर मुंबई पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने ब्रिमस्टोवॅट साखरे प्रकल्प राबवले. पावसाचे पाणी साठवण करून ते समुद्रात सोडण्यासाठी हिंदमाता, किग्ज सर्कल गांधी मार्केट, अंधेरी सबवे या ठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाक्या बसवल्या. मुंबई पूरमुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र आजही पावसाच्या हलक्या सरी बरसताच मुंबईतील अनेक भाग जलमय होतात. त्यामुळे मुंबईत काही वेळ जरी मुसळधार पाऊस बरसला तर आजही २६ जुलैच्या आठवणीने मुंबईकरांना धडकी भरते. शुक्रवार, २६ जुलै २०२४ रोजी मुंबईत आलेल्या महापुरास १९ वर्षे पूर्ण होत आहेत. १९ वर्षांनंतरही मुंबईतील भायावह स्थिती आठवल्यास अंगावर शहारा येतो, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत महापूर येण्यास पाऊस कारणीभूत ठरला, कारण त्यावेळी ९०० मिमीहून अधिक पाऊस पडला. तर प्लास्टिक पिशव्याही महापुरास कारणीभूत ठरल्याचे सांगत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री अथवा वस्तू देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री व खरेदी करणाऱ्यांवर कारवाईचे हत्यार उपसले. कारवाई करत हजारो रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. मात्र राजकीय हस्तक्षेपानंतर कारवाई थंडबस्त्यात गेली, त्यामुळे गल्लीबोळात ते बड्या दुकानात आजही या पिशव्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुंबईची तुंबई होण्यास पालिका प्रशासन व राजकीय पक्ष जबाबदार आहेत, असा आरोप मुंबईकरांनी केला आहे.
किंग्ज सर्कल, हिंदमाता परिसराला दिलासा
दरम्यान, किंग्ज सर्कल, हिंदमाता परिसर जलमुक्त करण्यासाठी पाणी साठवण करणाऱ्या भूमिगत टाक्या बसवल्याने या परिसराला काहीसा दिलासा मिळाला, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यास, येथे पाणी साचण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.