कुठल्या प्रभागात कुठल्या आजाराचे अधिक रुग्ण येतात, याचा आढावा घेत घराजवळील दवाखान्यात त्या-त्या आजाराची चाचणी करण्यात येणार आहे. मलेरिया, डेंग्यू या आजाराची चाचणी होत असताना आता त्वचा, डोळे, नाक, कान, घशाची चाचणी घराजवळील दवाखान्यात करणे शक्य होणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत प्रथम १३ दवाखान्यांत ही योजना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दैनिक ‘नवशक्ति’ला दिली.
रुग्णांना घराजवळच चाचणी करता यावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत पालिकेच्या दवाखान्यात चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे; मात्र याआधी कुठल्या विभागातील दवाखान्यात कुठल्या आजाराचे रुग्ण येतात, याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. अभ्यासानंतर ज्या दवाखान्यात ज्या-ज्या चाचणीची मागणी करण्यात आली, त्या-त्या दवाखान्यात चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे संजीवकुमार यांनी सांगितले.
मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, एक्स-रे, सीटी स्कॅन, मॅनोग्राफी अशा विविध १३८ प्रकारच्या मोफत चाचण्या आता घराजवळच करणे शक्य होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात १३ दवाखाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे. भविष्यात २०० दवाखान्यांत ही सेवा पुरवण्यात येईल. दरम्यान, या केंद्रांवर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून केईएम, शीव, नायर व कूपर या मोठ्या रुग्णालयातील स्पेशालिस्ट डॉक्टरांचे सल्ले-सेवा उपलब्ध होणार असल्याचे संजीवकुमार म्हणाले.
मुंबई महापालिकेची नायर, केईएम व सायन ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. मुंबईसह देशभरातील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. या रुग्णालयांवरील ताण कमी करणे आणि मुंबईकरांना घराजवळच चाचणी व उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरू करण्याचे २०२२-२३च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित होते. आता या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १३ दवाखान्यांमध्ये आवश्यक चाचण्यांची यंत्रसामग्रीची व्यवस्था करणे, तज्ज्ञ डॉक्टरांची-आरोग्य कर्मचार्यांची व्यवस्था करणे, अशी कामे सुरू आहेत.
रहिवाशांचा त्रास कमी होईल!
ए वॉर्ड, लाला निगम रोड, बृहन्मुंबई महापालिका बिल्डिंग असून, पहिल्या मजल्यावर कुलाबा दवाखाना आहे. या दवाखान्यात मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग याची तपासणी करण्यात येते; परंतु कुलाबा परिसरात स्कीन व गायनिकचे रुग्ण अधिक येतात. त्यामुळे या योजने अंतर्गत यापुढे स्कीनसंबंधी व गायनिकसंबंधी तपासणी करण्यात येईल, अशी माहिती कुलाबा दवाखान्यातील आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.
या दवाखान्यांतून चाचणीला सुरुवात
कुलाबा दवाखाना
कुंभार वाडा दवाखाना - धारावी
गुरुनानक आंबेडकर दवाखाना - खार
बनाना लीफ दवाखाना - अंधेरी
जुहू जालन दवाखाना
राठोडी दवाखाना - मालाड
शैलजा गिरकर दवाखाना - कांदिवली
काजू पाडा दवाखाना - कुर्ला
आनंद नगर दवाखाना - दहिसर
अणिक नगर दवाखाना - चेंबूर
साईनाथ दवाखाना - घाटकोपर
टागोर नगर दवाखाना - पवई
दीनदयाळ उपाध्य दवाखाना - मुलुंड