संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मिठाई उत्पादक-विक्रेत्यांवर FDA चा वॉच; सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी मुंबई-ठाण्यात विशेष मोहीम

अन्न व औषध प्रशासन विभागाने ३१ डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई व ठाण्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : दसरा, दिवाळी, ख्रिसमस या सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, मावा उत्पादन व त्याची विक्री होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने ३१ डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई व ठाण्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेत उत्पादन व विक्री करणाऱ्या दुकानांची झाडाझडती घेतली जाणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात भेसळयुक्त खवा, मिठाई, मावा मसाला असा चार लाखांचा माल जप्त करण्यात आल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.

सणासुदीच्या कालावधीत मिठाई, दुधासह खाद्यतेलांची मागणी वाढत असल्यामुळे होणारी भेसळ आणि गैरप्रकार टाळण्यासाठी ‘एफडीए’ने धडक कारवाई सुरू केली असून ७४८ किलोचा मसाला, तर आवश्यक दर्जा नसलेले ७४४ किलो रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलही जप्त करण्यात आले आहे. मसाल्याच्या पाकिटावर कोणतेही लेबल, माहिती नसून ताब्यात घेण्यात आलेल्या मसाल्याची किंमत २ लाख ८४ हजार २४०, तर रिफाइंड ऑइलची किंमत १ लाख ११ हजार ६०० रुपये आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक माहिती नसलेले व दर्जाहीन पदार्थ नागरिकांनी घेऊ नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभागाकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवा दरम्यान अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभाग व ठाणे कार्यालयाने एकत्रितरीत्या विशेष मोहीम राबवून मिठाई, खाद्यतेल व इतर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या अन्न आस्थापनांच्या बृहन्मुंबई विभागात एकूण ६० तपासण्या करण्यात आल्या. एकूण ७२ अन्न नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले आहेत. सदर अन्न नमुन्यांचे अहवाल प्राप्त होताच कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, सणासुदीच्या दिवसानिमित्त १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत व्यावसायिकांना मार्गदर्शन व सूचनाही देण्यात येत आहेत.

भेसळयुक्त दूधही केले नष्ट

टॅम्पर्ड मिल्कसंदर्भात मालाड पूर्व येथे धाडी टाकण्यात आल्या व विविध कंपन्यांच्या पॅक्ड दुधाचा एकूण २८५ लिटर साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. याची किंमत १७ हजार २८ रुपये इतकी आहे. दरम्यान, सर्व नमुने विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एफडीए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. जनतेला सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी अशा मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहिती सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई विभाग म. ना. चौधरी यांनी दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी