मुंबई

मुंबई अग्निशमन दलाचा ध्वज एल्ब्रस शिखरावर फडकला

प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे जवान योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छींद्र शेळके या दोघांनी युरोपातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट एल्ब्रसवर भारतीय स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता यशस्वीरीत्या पोहोचून शिखर सर केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आणि खडतर हवामानाचा सामना करीत केलेल्या या अभिमानास्पद कामगिरी प्रसंगी या दोन्ही जवानांनी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि त्यासोबत मुंबई अग्निशमन दलाचा ध्वजदेखील एल्ब्रस शिखरावर अभिमानाने फडकवला.

भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षात सध्या कार्यरत असलेले योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छींद्र शेळके या दोन्ही अग्निशमन जवानांना गिर्यारोहणाची आवड आहे. गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च पर्वत शिखरे सर करण्याचे त्यांचे ध्येय आहे. बडगुजर व शेळके यांनी यापूर्वी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो स्वतंत्ररीत्या आणि यशस्वीपणे सर केले होते. बडगुजर आणि शेळके यांच्या यशाबद्दल महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, सह आयुक्त (सुधार) केशव उबाळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

पर्वतारोहण आव्हानात्मक

माउंट एलब्रस हे युरोपात काकेशस पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १८ हजार ५०५ फूट) आहे. रशियाच्या नैऋत्येला स्थित आणि काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांच्या मध्ये वसलेल्या या शिखरावरील पर्वतारोहण तांत्रिकदृष्ट्या मध्यम आव्हानात्मक मानले जात असले तरी येथील हवामान मात्र प्रचंड लहरी आहे. वर्षभर सातत्याने येणारी हिम वादळे, उणे २५ अंश पर्यंत घसरणारे तपमान आणि शरीर गोठवून टाकणारी थंडी, त्यामुळे येथे अनेक गिर्यारोहकांना प्राणदेखील गमवावे लागले आहेत.

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

पत्नीची हत्या करून पतीचे पलायन; अपघाताचा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, आरोपी सासूला अटक

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

पत्रकाराच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ : पियुष गोयल यांच्यासाठी सोपी वाट