गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार; बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव छायाचित्र - सोशल मीडिया
मुंबई

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

गणेशोत्सव सुरू होताच फुलांची मागणी प्रचंड वाढणार असल्याने यंदाही ऐन गणेशोत्सवात फुलांचा भाव चढेच असणार असा अंदाज फुल विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे, तर ऐन उत्सव काळात राज्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यास फुलांचे दर खूपच वधारणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तेजस वाघमारे

मुंबई : गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. गणेश आगमनाची लगबग सुरू असतानाच फूल बाजारही तयारीला लागला आहे. गणेशोत्सव सुरू होताच फुलांची मागणी प्रचंड वाढणार असल्याने यंदाही ऐन गणेशोत्सवात फुलांचा भाव चढेच असणार असा अंदाज फुल विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे, तर ऐन उत्सव काळात राज्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यास फुलांचे दर खूपच वधारणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गणेशोत्सव सुरू होताच मुंबईतील प्रमुख बाजारपेठ असलेल्या दादरच्या फुल बाजारात जास्वंद, झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा तसेच विविध प्रकारच्या फुलांच्या हारांना मागणी असते. त्यासोबतच गणेश पूजनासाठी आवश्यक असलेल्या अन्य साहित्याचीही मागणी वाढते.

उत्सव काळात नागरिकांना स्वस्त भावात फेरीवाल्यांकडे विविध वस्तू उपलब्ध होतात. परंतु मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या महापालिकेमार्फत कारवाई सुरू आहे. याचा परिणाम यंदा फुलांच्या भावावर होणार आहे. भक्तांना परवडणाऱ्या किमतीमध्ये फुले उपलब्ध व्हावीत, तसेच फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून गणेशोत्सव काळात फेरीवाल्यांवरील कारवाई तात्पुरती थांबविण्यात यावी, अशी मागणी दादर फुल मार्केट असोसिएशनचे उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी केली आहे.

निसर्गाच्या लहरीपणावर ठरणार किंमत

फुले ही नाशवंत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत फुले विक्रीसाठी येतात. परंतु रस्त्यांवरील खड्डे आणि पोलिसांमार्फत होणारी कारवाई यामुळे फुले पोहोचण्यास वेळ होत असल्याने फुलांच्या दर्जावर परिणाम होत आहे. सरकारने रस्त्यांवरील खड्डे आणि अनावश्यक कारवाई रोखल्यास मुंबईकरांना अधिक चांगल्या दर्जाची फुले वेळेत उपलब्ध होऊ शकतील. ऐन उत्सव काळात राज्यात पाऊस झाल्यास त्याचा फुलांच्या किंमतीवर परिणाम होईल, असे पांडुरंग आमले यांनी सांगितले.

खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या खरेदीसाठी रविवारी मुंबईतील प्रमुख बाजार पेठांमध्ये मोठी झुंबड उडाली होती. खरेदीसाठी आजचा सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. परंतु उपनगरी रेल्वे मार्गांवर असलेल्या मेगाब्लॉकमुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

आवक कमी व मागणी वाढल्यास फटका

हार, दुर्वा, बेल पत्ता, तुळस यांनाही वाढती मागणी असते. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सजावट आणि पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी दादर फूल मार्केटमध्ये येतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात फुलांची मागणी अचानक वाढते. सततचा पाऊस, अतिवृष्टी किंवा हवामानातील बदल यामुळे फूलशेतीचे नुकसान झाल्यास बाजारात फुलांची कमतरता निर्माण होते. आवक कमी आणि मागणी वाढल्यास फुलांच्या किमती वाढतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या आणि गौरी आगमनाच्या दिवसांत फुलांच्या दरात वाढ होते.

कारवाईचा परिणाम फुलांच्या विक्रीवर

त्यातच मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा परिणाम फुलांच्या विक्रीवर होऊ लागला आहे. दादर पश्चिम भागात फेरीवाल्यांकडे दुकानदारांच्या तुलनेने कमी दरात फुले आणि हार उपलब्ध होत होतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्यांच्याकडे खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे विक्रेते कमी झाल्यास ग्राहकांना मोठ्या दुकानदारांकडून अधिक दराने फुले खरेदी करावी लागू शकतात, असे फेरीवाल्यांकडून सांगण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात राज्यात पाऊस सुरू होतो. त्यामुळे फुलांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे निसर्गाची साथ आणि बाजारातील आवक यावरच गणेशोत्सवातील फुलांच्या दरांचे भवितव्य ठरणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाणीही महागणार! BMC त पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या हालचाली; महसूलवाढीसाठी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता, प्रस्ताव लवकरच आयुक्तांच्या मंजुरीसाठी

Mumbai : लालबाग, परळचे पदपथ झाले मोकळे; बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवले; सलग दोन दिवस केली कारवाई

'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा

दिल्लीत इमारत कोसळली; ४ ठार, ५ गंभीर

MPSC Paper Leak: ...तर आयोगातल्या व्यक्तीलाही शिक्षा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन