मुंबई : गणेश उत्सवानिमित्त बाजार सजले असून खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडू लागली आहे. गणरायचे धूम धडाक्यात स्वागत करण्यासोबतच घरातील वातावरण मंगलमय आणि आकर्षक करण्यासाठी भाविक विविध वस्तूंच्या मदतीने सजावट करण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. गेल्या वर्षीपासून गणपती सजावटीसाठी झुंबर खरेदी करण्यास भाविक पसंती देऊ लागले असून बाजारात १०० रुपयांपासून ते २ हजारांपर्यंत झुंबर उपलब्ध आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे लहान मोठी गणेशोत्सव मंडळे जोमाने कामाला लागली आहेत. तसेच घरगुती गणपतीच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजार सजले आहेत. गणपतीची आभूषणे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भाविक बाजारामध्ये गर्दी करू लागले आहेत. मनीष मार्केट, दादर, भुलेश्वर, लोहार चाळ येथे खरेदीसाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. झालर, लाईट, पट्टा लाईट अशा विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे.
दिव्यांच्या रोषणाईसाठी प्रसिद्ध असलेल्या लोहार चाळीमधील दुकानेही सज्ज झाली आहेत. विविध प्रकारचे सजावटींच्या साहित्यांच्या खरेदीसाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. येथील बाजारात विविध प्रकारच्या झुंबरची खरेदी वाढली आहे. येथे झुंबरचे आकार आणि प्रकारानुसार त्याच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. १०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत झुंबरच्या किमती आहेत. गेल्या वर्षीपासून झुंबरची मागणी वाढली असल्याचे, लोहार चाळीतील मोरया इंटरप्राईजेसचे मालक मनोज देसले यांनी सांगितले.
आम्ही झुंबर घरीच तयार करतो. याची तयारी चार ते पाच महिन्यांअगोदर सुरू होते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे यासाठी सहकार्य लाभते. झुंबर तयार करण्याचे काम ठाण्यात चालते. त्यानंतर हे झुंबर विक्रीस येथे घेऊन येतो. वीस वर्षे हा व्यवसाय करत असून आता याला ऑनलाईन मागणी वाढल्याचे, देसले यांनी सांगितले.
सजावटीच्या वस्तूंच्या किमती
लाईट - १० मीटर (५० रुपये), २० मीटर (८० रुपये), २५ मीटर (१५० रुपये)
स्पॉट लाईट - ७० रुपयांपासून
पट्टा लाईट ६५० रुपये
मागे लावण्यास फिरते लाईट -१६०० रुपयांपासून
ओम - ५०० रुपये
वॉटर प्रूफ लाईट - ७५० रुपये (१०० फूट)
ट्यूब - ११० रुपये एक नग
झालर १० बाय १० - ३५० रुपये
पाइप तोरण - २५० रुपये पीस