मुंबई : मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातील बाधित चार गावांचे ५ किलोमीटर अंतराच्या परिसरात पुनवर्सन करण्यात येणार असून बाधित कुटुंबांना १० ते १२ लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. बाधित कुटुंबांतील एका सदस्याला पालिकेत नोकरी देण्यात येणार असून प्रकल्पात बाधित तीन लाख झाडे जवळच पुनर्रोपित करण्यात येणार आहेत.
मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गारगाई धरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पातून मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पात चार गावे बाधित होणार असून त्या गावांचे वाडा तालुक्यातील देवळी गावात ३३४ हेक्टर जमिनीवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर तीन लाख झाडे तानसा धरणाजवळ ५ किलोमीटर अंतरावर पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात ६५८ हेक्टर जमिनीवर नवीन झाडे लावली जाणार असून यासाठी वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर झाडांचे पैसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पात बाधित कुटुंबांना भूसंपादन कायद्यानुसार १० ते १२ लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला पालिकेत नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
मुंबईला सात धरणातून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मुंबईला ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प राबवत असताना सहा गावे बाधित होणार असून यात दोन गावे बुडीत क्षेत्रात येतात. तर चार गावांचे पुनर्वसन देवळी गावात करण्यात येणार आहे. गारगाई धरण प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून यासाठी ३,२०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
चार गावांत सोयीसुविधा
गारगाई धरण प्रकल्पात बाधित चार गावांचे पुनर्वसन करताना त्या परिसरात शाळा, रस्ते, पाणी, वीजपुरवठा, रुग्णालय, दवाखाना, ग्रामपंचायत, मंदिर अशा सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.