मुंबई : युनियन इंटरनॅशनल डेस असोसिएशन डी'अल्पिनिझम (यूआयएए) कडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित माऊंटन प्रोटेक्शन ॲॅवॉर्ड २०२५ साठी भारतातील पहिलाच गिर्यारोहण डिप्लोमा नामांकित झाला आहे. गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगला (जीजीआयएम) यूआयएए माऊंटन प्रोटेक्शन ॲॅवॉर्ड २०२५ साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. जगभरातील १९ देशांमधून निवडलेल्या एकूण २० प्रकल्पांपैकी, हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे.
गिरिप्रेमीचे वरिष्ठ गिर्यारोहक आणि जीजीआयएमचे संस्थापक संचालक उमेश झिरपे म्हणाले की, भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की माऊंटनियरिंगमधील डिप्लोमा अधिकृतपणे जगातील प्रतिष्ठित अशा यूआयएए माउंटन प्रोटेक्शन ॲॅवॉर्ड (एमपीए २०२५) साठी निवडला गेला आहे. २०२१ मध्ये भारतात पहिल्यांदाच, जीजीआयएमने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनियरिंग (एनआयएम) उत्तरकाशी यांच्या सहकार्याने हा डिप्लोमा कोर्स सुरू केला.
प्रशिक्षणार्थींचा डिप्लोमा पूर्ण
डिप्लोमा इन माउंटनियरिंगच्या गेल्या तीन बॅचमध्ये आतापर्यंत ७५ हून अधिक प्रशिक्षणार्थींनी हा डिप्लोमा पूर्ण केला आहे आणि ते पर्वतारोहण, साहस, शाश्वतता आणि निसर्ग संवर्धनाच्या प्रगतीसाठी योगदान देत आहेत.