मुंबई : गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, अशी सगळ्यांची भावना आहे. परंतु पीओपी गणेशमूर्तींना पर्याय दिल्यास बरे होईल, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. दरम्यान, गणेश मंडळ, मूर्तिकार व समन्वय समितीची बैठक गुरुवारी पार पडली.
मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. मुंबईतील गणेशोत्सवाला १२५ ते १३० वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सवात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील लोक येत असतात. मुंबई शहर तसेच उपनगरात सन २०२५मधील सार्वजनिक सण व उत्सव पर्यावरणपूरक रीतीने साजरा करण्यासाठी पूर्वतयारी बैठक गुरुवारी पार पडली. ३० ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पीओपीच्या गणेशमूर्ती संदर्भात दिलेल्या निर्णयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य, उचित व न्यायाला धरून आहे. परंतु दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी पीओपी मूर्तीला योग्य तो पर्याय संबंधित पर्यावरण विभाग व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळाला तर योग्य होईल. सद्यस्थितीत
मुंबई व उपनगरात जवळजवळ १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दोन लाखांहून अधिक घरगुती गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे संबंधित पर्यावरण विभाग व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीला पर्याय सूचित करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवात दहा हजार कोटींची उलाढाल
मुंबईतील गणेशोत्सवात साधारणतः दहा हजार कोटींची उलाढाल होते. यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. तसेच केंद्र शासनाला जीएसटी मिळतो. त्यामुळे २०२५ चा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी पीओपीला पर्याय उपलब्ध करून दिल्यास योग्य होईल, असे दहिबावकर यावेळी म्हणाले.