मुंबई

कुर्ला येथे भीषण आगीत गोदामे खाक, सुदैवाने कोणीही जखमी नाही

शुक्रवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास एका गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, प्लायवूड, लाकडांचा साठा, कॉम्प्युटर पार्ट‌्स, कपड्यांचा साठा अशा ज्वलनशील वस्तूंना आग

प्रतिनिधी

कुर्ला पश्चिम एल.बी.एस. मार्ग येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत कपडे, कॉम्प्युटर पार्ट‌्स, लाकडी फर्निचर, ऑटोमोबाइल भंगार इत्यादींचा साठा असलेली ४-५ गोदामे जाळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

कुर्ला (प.), एल.बी.एस. मार्ग, डिलक्स हॉटेलसमोर कपडे, ऑटोमोबाइल पार्ट‌्स, कॉम्प्युटर पार्ट‌्स, लाकडी फर्निचर, लाकडे, प्लायवूड इत्यादींचा साठा असलेली एकमजली गोदामे आहेत. शुक्रवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास एका गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, प्लायवूड, लाकडांचा साठा, कॉम्प्युटर पार्ट‌्स, कपड्यांचा साठा अशा ज्वलनशील वस्तूंना आग लागल्याने ही आग भडकली होती. त्यामुळे अंदाजे ५ हजार चौरस फूट जागेतील गोदामांना ही आग लागली.

दरम्यान, या आगीची तक्रार प्राप्त होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्यस सुरुवात केली, मात्र आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाने आगीचा स्थर-२ असल्याचे घोषित केले. अग्निशमन दलाने ८ फायर इंजिन व ६ वॉटर टँकर्स यांच्या साहाय्याने या आगीवर सकाळी ११.२० वाजता नियंत्रण मिळवले. दरम्यान, ही आग का व कशी लागली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

माझगावच्या अहमद बिल्डिंग येथील आगीवर नियंत्रण

शुक्रवारी दुपारी माझगाव येथील महापुरुष मंदिर मार्ग, अहमद बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरील एका घराला दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. शुक्रवारी दुपारी १२ वाजता भायखळा पोलीस ठाणे हद्दीत रूम नंबर ३३, अहमद बिल्डिंग, गणपावडर रोड, माझगाव येथील नरेश जैन यांच्या मालकीच्या घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फायर ऑफिसर शिंदे, शेख व भायखळा अग्निशमन दलाने १२.४८ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेत रूममधील सामान जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत