लिफ्ट म्हणजे दैनंदिन आयुष्यातील मोठी सोय. जड सामान हलवणं असो, वेळ वाचवायची घाई असो किंवा थकवा टाळायचा असो, आपण सर्रास लिफ्टचा वापर करतो. मात्र हीच सोय क्षणात गंभीर अपघाताचं कारण ठरू शकते, याची जाणीव गोरेगाव पश्चिमेतील अलीकडील घटनेनंतर पुन्हा एकदा झाली आहे.
गोरेगाव पश्चिम येथील अनमोल टॉवरमध्ये सोमवारी (दि. २) रात्री लिफ्टमध्ये गॅसने भरलेले फुगे नेत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात २१ वर्षीय विद्यार्थिनी हिमानी ताप्रिया गंभीर जखमी झाली, तर फुगे घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयलाही भाजले आहे. लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची तीव्रता सर्वांसमोर आली. पोलिसांनी या प्रकरणी फुगे विक्रेत्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून, अग्निशमन विभागाने लिफ्टमध्ये ज्वलनशील वस्तू वाहून नेण्याबाबत कठोर इशारा दिला आहे.
पाहा व्हिडिओ
लिफ्ट ही बंद जागा… धोका अनेकपटींनी वाढतो
लिफ्ट ही पूर्णपणे बंद आणि मर्यादित जागा असते. येथे हवा खेळती नसते, उष्णता पटकन साचते आणि छोटासा स्पार्क, घर्षण किंवा स्टॅटिक चार्जही मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे काही वस्तू लिफ्टमधून नेणं थेट जीवाशी खेळ ठरू शकतं.
लिफ्टमधून 'या' वस्तू नेणं का धोकादायक?
१) गॅसने भरलेले फुगे किंवा सिलिंडर
हायड्रोजन किंवा अन्य ज्वलनशील गॅस असलेले फुगे बंद जागेत अत्यंत धोकादायक असतात. घर्षण, स्पार्क किंवा स्टॅटिक वीजेमुळे क्षणात आग किंवा स्फोट होऊ शकतो. गोरेगावची घटना याचं जिवंत उदाहरण आहे.
२) लिथियम बॅटऱ्या आणि पॉवर बँक्स
ई-स्कूटर, लॅपटॉप बॅटरी किंवा जास्त क्षमतेच्या पॉवर बँक्स 'थर्मल रनअवे'मुळे स्वतःहून पेट घेऊ शकतात. लिफ्टमध्ये अशी आग लागल्यास बाहेर पडण्याची संधीही मिळत नाही.
३) पेट्रोल, थिनर आणि केमिकल्स
घराच्या दुरुस्तीवेळी वापरली जाणारी ज्वलनशील रसायनं बंद लिफ्टमध्ये नेणं अत्यंत धोकादायक आहे. यांची वाफ हवेत मिसळून स्फोटक वातावरण तयार होऊ शकते.
४) क्षमतेपेक्षा जड फर्निचर
लिफ्टची वजनमर्यादा ओलांडल्यास ती अचानक बंद पडू शकते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त सामान लिफ्टमधून नेऊ नये. कारण अचानक लिफ्ट बंद पडल्यास गुदमरण्याची शक्यता बळावते.
५) मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं
फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारखी उपकरणांची ने-आण करताना वायरींग खराब होऊन शॉर्ट सर्किट किंवा ठिणगी निर्माण होण्याचा धोका असतो.
'फक्त दोनच मजले आहेत' हीच चूक ठरते घातक
"आधीही नेलं आहे", "काही होणार नाही", "थोड्याच वेळासाठी आहे"- अशा विचारांमुळे अनेक जण धोका गृहित धरतात. मात्र गोरेगावमधील झालेल्या या घटनेने हे स्पष्ट केलं आहे की अपघात क्षणात घडतो आणि नशीब प्रत्येक वेळी साथ देईलच, याची खात्री नसते.
सुरक्षिततेसाठी काय करायला हवं?
गॅस, केमिकल्स आणि ज्वलनशील वस्तूंसाठी सर्व्हिस लिफ्ट वापरणे
शक्य असल्यास असे सामान जिन्यांमधून किंवा खुल्या जागेतून ने-आण करणे
लिफ्टची वजनमर्यादा काटेकोरपणे पाळणे
सोसायट्यांनी लिफ्ट वापराबाबत स्पष्ट नियम व सूचना लावणे
लिफ्ट ही केवळ सोयीसाठी आहे, धोकादायक वाहतुकीचं साधन नाही. गोरेगावमधील घटनेत दार उघडंच होतं (दार बंद होण्याआधीच स्फोट) म्हणून मोठा अनर्थ टळला; मात्र प्रत्येक वेळी असं होईलच, याची हमी देता येत नाही. म्हणूनच थोडीशी जागरूकता आणि योग्य निर्णयच जीव वाचवू शकतो.